पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रोत्सवादरम्यान प्रशालेत गरबा नृत्य कार्यक्रमात खेळताना चक्कर येऊन पडल्याने आजिवली-मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. वैष्णवी अकरावीमध्ये शिकत होती. गरबा नृत्याचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता कडक उन्हामध्ये प्रशालेच्या उघड्या मैदानात होता. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. यावेळी मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यात आला होता.
वैष्णवी ही खेळताना मैदानात खाली कोसळली. ती जवळपास दहा मिनिटे मैदानावर उन्हात पडून होती. त्यावेळेस मुख्याध्यापक तानाजी देसाई यांनी तिला चक्कर आली आहे, बरी होईल, असे सांगून दुर्लक्ष केले. मुख्याध्यापकांच्या हलगर्जीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.