: राज्यातील जत हा २८८ वा शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे, तर या मतदारसंघाच्या मतदार यादीतील कॉत्येव बोबलाद गावातील २८७ वे शेवटचे मतदार केंद्र आहे. या केंद्रातील शेवटचा मतदार कुमार संजय लोणार (वय २०) याने बुधवारी, दि. २० रोजी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. सांगलीच्या पूर्व भागातील दुष्काळी जत तालुक्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागात कॉत्येव बोबलाद हे गाव आहे. या छोट्या गावातील वस्तीवर करेवाडी रस्त्यावर कुमार संजय लोणार (वय २०) हा राहतो. शेतीची कामे करून गावापासून २० किलोमीटर अंतरावरील संख (ता. जत) येथील डॉ. आर. के. पाटील महाविद्यालयात बीएस्सी (रसायनशास्त्र) तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.
आई-वडिलांसह लहान बहीण व भाऊ असे पाच जणांचे त्याचे कुटुंब आहे. त्याची २० एकर इतकी कोरडवाहू शेती आहे. कॉत्येव बोवलाद जत तालुक्यापासून ५५ किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यापासून १२४ किलोमीटर अंतरावर आहे. या मतोत्सवात कुमार लोणार याने प्रथमच मतदानाचा हक्क बजावून आपल्या नागरिकत्वाचा हक्क बजावला आहे. राज्यातील या शेवटच्या मतदार केंद्रावर अत्यंत उत्साहात मतदान पार पडले. येथील ग्रामस्थांनीही आपला हक्क बजावला.
मी बीएस्सी (रसायनशास्त्र] तृतीय वर्षात शिकत आहे. पोलिस भरतीसाठी प्रयत्न सुरू आहे. नोकरी मिळाली नाही तर व्यवसाय करणार आहे. मी पहिल्यांदाच मतदान केले आहे. शेतीसाठी पाण्याचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडविणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे.
कुमार संजय लोणार, – कोत्येव बोबलाद