माढ्याच्या आ. शिंदेंच्या तीसवर्षे वर्चस्वाला धक्का

0
283

  • माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव शिंदे यांच्या तीस वर्षे एकहाती वर्चस्वाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अभिजित पाटील यांनी पहिल्या क्रमांकाची पसंतीची मते मिळवली. आमदार शिंदे यांचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांचा ३० हजार ३७१ मतांनी पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. आ. शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. एक ते चौदा फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अभिजित पाटील यांना ६७ हजार ७१० तर अपक्ष रणजितसिंह शिंदे यांना ६५ हजार ३४ मते मिळाली. यामध्ये शिंदे यांच्या माढ्यातूनच अभिजित पाटील यांना २ हजार ६७६ मतांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर १५ व्या फेरीपासून पंढरपूर भागातील मतमोजणीला सुरुवात झाली आणि १५ पासून २६ व्या फेरी फेरीपर्यंत महाविकास आघाडीच्या अभिजित पाटील यांनी प्रत्येक फेरीत मतांची आघाडी घेत अखेरच्या २६ व्या फेरीत १ लाख ३५ हजार ४१८ मते मिळविली. तर अपक्ष रणजितसिंह शिंदे यांना १ लाख ५ हजार ४७ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अॅड. मीनल साठे यांना १३ हजार २८० मते मिळाली.

पोस्टल मतातही घेतली आघाडी

माढ्यातील एकूण २२८४ पोस्टल मतांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पाटील यांना १ हजार १४१ मते मिळाली. अपक्ष रणजितसिंह शिंदे यांना ८९१ मते तर, महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. मीनल साठे यांना १०१ मते मिळाली.

खासदार शरद पवार आणि मोहिते-पाटील या दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद आणि माढा मतदार संघातील सर्व मतदारांनी शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्यायचे की तीस वर्षे घरात सत्ता असलेल्या असलेल्यांना निवडून द्यायचे याचा विचार करून मला साथ दिली. मतदारांनी वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर ३० हजारांच्या मताधिक्याने मला निवडून दिले आहे. हा जनतेला विजय समर्पित करतो.

अभिजित पाटील, विजयी उमेदवार माढा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here