राज्यात कॉग्रेसचे अनेक मातब्बर उमेदवारांना झटका बसला असताना पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांनी ३० हजार ६४ इतके मताधिक्य घेऊन हॅट्ट्रिक साधली आहे.
त्यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला. कडेगाव येथील आयटीआय इमारतीत शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत संग्राम देशमुख यांनी ४५६ मतांनी आघाडी घेतली. पहिल्या १० फेऱ्यांत कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश होता. कडेगाव तालुक्यात विश्वजीत कदम यांनी ९ हजार ६६८ इतके मताधिक्य घेतले. त्यानंतर, ११ व्या फेरीपासून २१ व्या फेरीपर्यंत पलूस तालुक्यातील गावांचा समावेश झाला. पहिली फेरीवगळता अन्य सर्व फेऱ्यांमध्ये डॉ. कदम यांचे मताधिक्य वाढत राहिले.
२१ व्या फेरीअखेर निकाल जाहीर झाला त्यावेळी विश्वजीत कदम यांचे २८ हजार ८४३ इतके मताधिक्य झाले. टपाली व सैनिकांच्या मतांमध्ये विश्वजित कदम यांनी १२२१ इतके मताधिक्याचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अखेर ३० हजार ६४ इतके मताधिक्य मिळवले.
त्यामध्ये पलूस तालुक्याने १९ हजार १७५ मताधिक्य देऊन विश्वजित कदम यांच्या विजयात मोलाचे योगदान दिले. निकालानंतर, निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले यांनी डॉ. विश्वजित कदम यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी आमदार मोहनराव कदम, महेंद्र लाड, विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, शरद लाड आदी उपस्थित होते.