सांगली : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एचआयव्ही / एड्स च्या बाबतीत जनजागृती निर्माण करावी. ज्यांना याचा संसर्ग झालेला आहे, अशांना उपचाराचे महत्त्व सांगून नियमित उपचारासाठी प्रवृत्त करावे, इतरांनी त्यांच्याबाबत कलंक व भेदभावाची वर्तणूक करू नये व भविष्यात ते एचआयव्हीचे बळी पडू नयेत, हा एड्स जनजागृती फेरीचा उद्देश असल्याचे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हास्तरावर एच. आय. व्ही. एड्स जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व डॉ.भागवत, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शामराव जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम म्हणाले, एड्स जनजागृतीसाठी जिल्ह्यामध्ये विविध महाविद्यालयात तसेच युवक मंडळामध्ये व्याख्याने, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.यावर्षीही गेल्या वर्षी प्रमाणे एचआयव्ही संसर्गित वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून यावर्षीचे घोषवाक्य “TAKE THE RIGHT PATH” “मार्ग हक्काचा, सन्मानाचा” हे असल्याचे ते म्हणाले.जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष कर्मचाऱ्यांनी केले.




