विटा : घानवड (ता. खानापूर) येथील माजी उपसरपंच व सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण (वय ४६) यांचा धारदार शस्त्राने गळा बापूराव चव्हाण चिरून अज्ञातांनी निघृण खून केला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले असून हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गार्डी येथील नेवरी रस्त्यावर घडली.घानवड येथील बापूराव चव्हाण यांचे विटा येथे सोनारसिद्ध ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. त्यांचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्री व्यवसायही आहे.
सन २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांनी घानवड गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या कारकीर्दीत उत्त्क्त्कृष्ट कामकाज केले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजता ते गार्डी ते नेवरी रस्त्याने पोल्ट्री शेडवर बुलेट दुचाकीवरून (क्र. एम.एच.-१०- सीवाय-५२३१) निघाले होते.
त्यावेळी गार्डी गावच्या बाहेर थोड्या अंतरावर गेल्यानंतर लोकवस्ती कमी असलेल्या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची बुलेट दुचाकी अडवून धारदार चाकूने त्यांच्या गळ्यावर वार करून निघृण खून केला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.अज्ञात हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
माजी उपसरपंच व सराफ व्यावसायिक बापूराव चव्हाण हे मनमिळावू व शांत आणि संयमी स्वभावाचे मितभाषी म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. ज्याठिकाणी बापूराव चव्हाण यांच्यावर हल्ला करण्यात आला तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.