डिजिटल ओळखपत्र : विविध योजनांचा घेता येणार लाभ
सांगली: केंद्र सरकारच्या वतीने डिजिटल कृषी मिशनअंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देण्यासाठी फार्मर आयडी कार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. ही जबाबदारी महसूल विभागाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. ज्यांच्या नावे जमीन असेल, त्यांना हे डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. या माध्यमातून किसान सन्मान निधी, पीक विमासारख्या सुविधांचा लाभ घेणे सोपे होणार आहे.
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने फार्मर आयडी कार्ड ही योजना सुरू केली आहे. या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड देण्यात येणार आहे. हे कार्ड शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक केले जाणार आहे. जे शेतकऱ्यांच्या जमीन नोंदीशी जोडले जाईल. या महत्त्वपूणर्ण कार्ड याद्वारे विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
बँक, आधार, पॅनचा डेटाही मिळणार
फार्मर युनिक आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा वा सुविधेचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येणार आहे.
एकप्रकारे कागदपत्रांच्या कटकटीतून मुक्तता होणार आहे. सोबतच बँक खाते, आधार, पॅनचा डेटाही या माध्यमातून उपलब्ध होईल.
डिजिटल पद्धतीने करता येतील कामे
शेतकयांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना हाती घेण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व कामे डिजिटल पद्धतीने करता येतील
प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आयडी देणार
डिजिटल कृषी मिशनअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्यास युनिक आयडी देण्यात येणार आहे. याद्वारे सुविधांचा लाभ घेणे सोपे होईल.
फार्मर आयडी यासाठी ठरणार महत्त्वाचा
फार्मर आयडीच्या माध्यमातून किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, पीक विमा, हमीभावासाठी अर्ज करण्यासोबतच शासनाच्या अन्य योजनांचा थेट लाभ घेता येईल.
धुरा महसूलच्या खांद्यावर
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना युद्धपातळीवर पूर्णत्वाकडे जावी, यासाठी ही जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आली आहे. काम पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाने दिले आहेत.
काय कागदपत्रे लागणार?
• फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे आवश्यक आहेत.
• शेतात लागवड केलेल्या पिकांची माहिती महत्त्वाच्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करता येईल.