नियमितप्रमाणे तातडीच्या पासपोर्ट सेवेचाही अनेकांकडून लाभ
सांगली : पूर्वी दीड ते दोन महिन्यांच्या प्रतीक्षेने मिळणारा पासपोर्ट आता तातडीने अवघ्या दहा दिवसांत मिळू शकतो. पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ पासपोर्टसाठी तीन दिवसांच्या मुदतीत अपॉइंटमेंटची सोय दिली आहे. अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कागदपत्रांसाठी धावपळही होत नाही.विविध प्रकारच्या कागदपत्रांऐवजी फक्त एका आधारकार्डवरही काम होते. यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करतेवेळी पुढील तीन दिवसांत अपॉइंटमेंट मिळते. सात दिवसांत कार्यवाही होते आणि दहाव्या दिवशी पासपोर्ट मिळतो.
ही कागदपत्रे असणे आवश्यक
पासपोर्ट साइज फोटोच्या चार प्रती, रेशनकार्ड, छायाचित्र असलेले ओळखपत्र (निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स), जन्मतारख पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स), विवाहित महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट, आधारकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता पासपोर्ट काढताना लागते
८० अर्जाचा दररोज निपटारा
सांगलीच्या पोस्ट कार्यालयात पासपोर्टसाठी दररोज सरासरी ८० अर्ज दाखल होतात. त्याचा निपटारा नियमितपणे करण्यात येतो.
विदेशवारीसाठी आजच तरतूद
भविष्यात कधीहीँ विदेशवारीची संधी आली, तर त्यावेळी पळापळ होऊ नये, म्हणून आताच पासपोर्ट काढून ठेवता येतो. तशी तजवीज अनेकजण करतात.
पासपोर्ट काढायचा तर कुठे जाल?
तातडीच्या पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यासाठी passportindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते.जवळच्या केंद्रांची यादी येते त्यातून निवड करावी लागते. तारखेचाही पर्याय दिला जातो. तारीख व वेळ निवडून त्यानुसार त्या केंद्रात जावे लागते.
पासपोर्टचे शुल्क किती?
नॉर्मल ३६ पानांच्या पासपोर्टसाठी दीड हजार, ६० पानांसाठी २ हजार, तत्काळला ३६ पानांसाठी ३ हजार ५००, तर ६० पानांसाठी तत्काळला ४ हजार रुपये शुल्क आकारण्यात येते.
नोकरी, व्यवसाय, पर्यटनासाठी हवा पासपोर्ट
अनेक कारणांसाठी विदेशात जाताना पासपोर्ट काढावा लागतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्यांना याची गरज असते. सांगलीतून अशी विदेशवारी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.