जत : वधू-वरांच्या लग्नाआधीच्या भेटीगाठींच्या आठवणींसाठी नव्याने आलेल्या प्री वेडिंग शूटची क्रेझ शहरापासून गावापर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागात याचे अधिक आकर्षण आहे, तर शहरांमध्ये मध्यमवर्गीयांपेक्षा अतिउच्च मध्यमवर्गीय ते श्रीमंत कुटुंबांमध्ये खास या शूटसाठी थंड हवेची ठिकाणे, डेस्टिनेशन प्री वेडिंगचेही नियोजन केले जात आहे. सध्या लग्नसराईमुळे या शूटिंगसाठी छायाचित्रकारांची वेळ घेण्याची घाई सुरू आहे.
लग्न म्हटले की एक-दोन दिवसांचा मुख्य सोहळा अशीच काही पद्धत होती. पण आता प्री वेडिंग फोटो शूट या प्रकाराला अधिक पसंती दिली जात आहे. लग्नाआधी वधू-वराचे नव्या मॉडर्न फॅशनचे कपडे घालून हे फोटोशूट केले जाते.
गावाकडच्यांनाही हवं प्री-वेडिंग शूट
नवा ट्रेंड हा फक्त शहरी भागातच रुजतो असे नाही. आता समाजमाध्यमाने एवढी क्रांती केली आहे की क्षणार्धात फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामुळे प्री वेडिंग शूट गावापर्यंत पोहोचले नसेल तर नवलच.शहरीपेक्षा ग्रामीण भागामध्ये या फोटोशूटची क्रेझ जास्त आहे असा छायाचित्रकारांचा अनुभव आहे. शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अजून हा ट्रेंड फार आवडीचा नाही; पण श्रीमंतांमध्ये खास या शूटसाठी अन्य शहरांना पसंती दिली जाते.
खर्च किती?
• एका फोटो शूटसाठी कमीत कमी ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो.
• प्री वेडिंग शूट परगावी जाऊन करायचे असेल, डेस्टिनेशन प्री वेडिंग असेल तर हा खर्च एक ते दोन लाखांपर्यंतसुद्धा जातो.
• हा खर्च करायचीदेखील कुटुंबाची तयारी आहे.
हे धोकेही घ्या लक्षात…
• प्री वेडिंग शूटचे फोटो लग्नाच्या मुख्य सोहळ्यात दाखवले जातात.
• त्यामुळे हे करताना कशा पद्धतीचे पोज दिले जातात याची काळजी मुला-मुलींनी करणे गरजेचे आहे.
• आक्षेपार्ह किंवा सगळ्या कुटुंबीयांसमोर दाखवता येणार नाही अशा पद्धतीचे फोटो काढू नयेत.
प्री वेडिंग शूट झाल्यानंतर अनेक लग्न मोडल्याची उदाहरणे आहेत. त्याचे भांडवल होऊन पुढे मुला-मुलींचा विवाह ठरण्यात अडथळे निर्माण होतात.