जत : तालुक्यात महा-ई-सेवा केंद्र व एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्राकडून विविध प्रकारचे दाखले दिले जातात. नागरिकांनी विविध दाखल्यासाठी निर्धारित केलेल्या फीपेक्षा अतिरिक्त शुल्क घेतल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिला. ते म्हणाले, तालुक्यात महा-ई-सेवा केंद्र व नागरी सेतू केंद्रातून जातीचे, उत्पन्नाचे, नॉन क्रिमिलेअर, प्रतिज्ञापत्र यासह अन्य सुविधा दिल्या जात आहेत.
परंतु दरम्यानच्या कालावधीत काही केंद्रांतून ज्यादा पैसे मागणी केली जात आहे, असे निदर्शनास येत आहे. नागरिकांनी विविध प्रकारच्या दाखल्यासाठी व इतर कामांसाठी शासनाने निर्धारित केलेली रक्कम देण्यात यावी. यापेक्षा अधिकची रक्कम देऊ नये. शासनाने ठरवून दिलेल्या फीपेक्षा जादा रक्कम संबंधित केंद्र चालकाने व ऑपरेटरने मागणी केल्यास याबाबतची माहिती तहसील कार्यालयात द्यावी.
जेणेकरून वेळीच अशा चुकीच्या पद्धतीवर आळा घालता येणार आहे. तरी ग्रामस्थांनी, नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सजग राहून अतिरिक्त व जादा पैशाची मागणी केल्यास तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही धानोरकर यांनी म्हटले आहे.