संखला आता ‘या’कार्यालयासह तालुका करा

0
220

नागरिकांतून मागणी

जत : संख अप्पर तहसिलदार कार्यालया पाठोपाठ संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय व तालुका भूमी अभिलेख कार्यालय व्हावे अशी मागणी जत पूर्व भागातील नागरिकांतून होत आहे.

जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असा कर्नाटक राज्याच्या सीमेवरील दुष्काळी तालुका असून या तालुक्यात एकशे एकविस गावांचा समावेश होतो.तालुक्याचे विभाजन केले तर या तालुक्याचे तीन तालुक्यात विभाजन करणे शक्य आहे.परंतु शासनाने जत तालुक्याचे विभाजन दोन तालुक्यात करण्याच्या दृष्टिकोनातून मोठी लोकसंख्या असलेल्या संखची निवड केली आहे.संख अप्पर तहसिलदार कार्यालय अंतर्गत संख,तिकोंडी,उमदी व माडग्याळ या चार मंडल विभागाचा समावेश होतो.अप्पर तहसिलदार कार्यालय संख अंतर्गत असलेल्या या चार मंडल विभागात एक्कावन्न गावांचा समावेश होतो.

जत तालुक्यातील या मंडल विभागातील लोकांना महसुली कामासाठी यापूर्वी जत तहसिलदार कार्यालयात यावे लागत होते.यामध्ये लोकांचा वेळ व पैसा जात होता.परंतु संख येथे अप्पर तहसीलदार कार्यालय झाल्यामुळे येथिल लोकांची सोय झाली आहे.तरीही संख अप्पर तहसिलदार कार्यालय अंतर्गत असलेल्या चार मंडल विभागातील लोकांना जमिनी व घरांचे खरेदी- विक्री व अन्य कामासाठी येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते .या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे काम लगेच होईल याची खात्री नसते,कारण काही वेळा सर्व्हर डाऊन होणे,विद्यूत पुरवठा खंडीत होणे आदी कारणामुळे पक्षकारांची कामे न होता त्यांना हेलपाटे घालावे लागतात.

यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो.त्यामुळे संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय होणेसाठी जतचे माजी आमदार श्री.विक्रमसिंह सावंत यानी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला होता.याबाबतीत महसुल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे.महसुल मंत्रालयाकडून तो प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी याचा पाठपुरावा करून संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय होण्यासाठी मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करावा त्यामुळे  संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल,अशी मागणी या भागातील नागरिकातून होत आहे.

संख येथील लोकांना सिटीसर्व्हेच्या कामासाठी भूमी अभिलेख कार्यालय जतला यावे लागते संख या ठिकाणी भूमिअभिलेख कार्यालय मंजूर झाल्यास लोकांची सोय होणार आहे.याकरीताही आ.पडळकर यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा जत पूर्व भागातील पक्षकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.अप्पर तहसिलदार कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभागातील एक्कावन्न गावातील पक्षकारांसाठी संख येथे  ग्रामन्यायालय सुरू झाले आहे.

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी ग्रामन्यायालयाचे उद्घाटन केले आहे. संख या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस हे न्यायालय सुरू असल्याने या भागातील पक्षकारांची मोठी सोय झाली आहे.संख येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन मंजूर असून या पुढील काळात संखची वाटचाल ही संख तालुका निर्मीतीकडे झाल्याशिवाय राहणार नाही.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here