संख : हवामान बदलामुळे जत तालुक्यातील द्राक्ष शेतीला मोठा फटका बसू लागला आहे. रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान यामुळे डावणी, भुरी व करपा, बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागायतदार हबकला आहे. आहे. वारंवार होणारी वादळे व यामुळे वेळोवेळी बदलणारे वातावरण द्राक्ष शेतीला आव्हान देऊ लागली आहेत. याचा फटका आगाप द्राक्ष छाटण्यांसहित उशिरा घेतलेल्या छाटण्यांनाही होऊ लागला आहे. दुष्काळी जत तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः शेततळी बांधली आहेत. इतर पिकांना फाटा देत नगदी पीक व पोषक वातावरण म्हणून द्राक्ष शेतीला मोठी पसंती दिली. त्यामुळे तालुक्यात द्राक्ष लागवड क्षेत्रही वाढले आहे.
परंतु, कधी अवकाळी, कधी दुष्काळ, कधी रोगांचा प्रादुर्भाव, कधी पडत्या बाजारभावाचा फटका द्राक्ष बागायतदारांना सहन करावा लागत आहे. चालूवर्षी टँकरने पाणी घालून बागा जगविल्या, लाखो रुपये टँकरवर खर्च केला आहे. पाण्याअभावी ४० टक्के बागांच्या एप्रिलमध्ये खरड छाटणी झाली नाही, यावर्षी तर लांबलेल्या पावसाने द्राक्षबागांच्या उशिरा छाटण्या घेतल्यामुळे काही ठिकाणी फुलोरा स्टेजला, तर काही ठिकाणी फळधारणा अवस्थेत आहेत. परंतु, सध्या दिवसभर कडाक्याचे ऊन, रात्री कडाक्याची थंडी तर, पहाटे धुके यामुळे द्राक्ष बागांना डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
आगाप छाटणी घेतलेल्या बागांत फळकुज झाली आहे. फुलोरा स्टेजमधील बागा अडचणीत सापडल्या आहेत. बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. द्राक्षबागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे.पाण्याअभावी बागेची खरड छाटणी जुन, जुलै महिन्यात घेतल्या आहेत. खरड छाटणीच्या वेळी पाणी कमी मिळाले. बागेला लागणारे पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणाही झाली नाही. त्याचाही फटका द्राक्ष उत्पादनास बसणार आहे. बागेत कमी प्रमाणात द्राक्ष घड असल्याने आपसूकच द्राक्ष उत्पादनही घटणार आहे. त्याचा फटका द्राक्ष उत्पादनास व बेदाणा निर्मितीला बसणार आहे.