तासगाव : तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गांजा आणि अंमली पदार्थ विकले जात आहेत. मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत, याची पोलिसांनी माहिती नसणे शक्य नाही. गुन्हेगार पोलीस गाडीत बसून छापा कुठे टाकायचा, हे सांगत आहेत, असा घणाघाती आरोप करीत आमदार रोहित पाटील यांनी तासगाव पोलिसांचे वस्त्रहरण केले. व्हॉट्सॲप चॅटवर मटका सुरू आहे. निर्भयापथक तासगाव कॉलेजसमोर पाहिजे. पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत मला हे चालणार नाही. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर पुरावे घेवून बसेन, अशा तीव्र शब्दात आ. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले.
रोहित पाटील यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर ते ‘ॲक्शन मोड’मधे आल्याचे दिसले. तासगाव तहसील कार्यालयात त्यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.
पहिलीच आढावा बैठक दोन तासांहून अधिक काळ चालली. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी किशोर माने, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पंचायत समिती व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागनिहाय आढावा घेतला. सुरुवातीला तहसीलदार अतुल पाटोळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या लोककल्याणकारी योजना जास्तीत – जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामधे लोकप्रतिनिधी या नात्याने जबाबदारी पार पाडण्यात मी कमी पडणार नाही.
अनेक शासकीय योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या पोहोचल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून आपण सर्वजण मिळून त्यासाठी प्रयत्न करूया. त्यासाठी कार्यालयात योजनांचे फलक लावणे, असे उपक्रम राबविता येतील, असेही ते म्हणाले. पशु संवर्धन विभाग शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच, नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासकीय कार्यालयात खाजगी लोकांचा वावर वाढला आहे. अशा लोकांकडून सर्वसामान्य लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत, असा प्रश्न करून ज्या विभागात असे लोक काम करत असतील तर ते ताबडतोब बंद व्हायला हवे, अशी सूचना त्यांनी केली.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच आढावा बैठकीच्या निमित्ताने रोहित पाटील ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याचे दिसून येत आहे. तासगाव शहरातील अवैध धंदे असतील अथवा विविध विभागांमध्ये सामान्य लोकांची होणारी ससेहोलपट असेल यावरून आमदार पाटील यांनी प्रशासनाची झाडाझडती केली. सामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने काम करावे, अशा सूचना दिल्या. पहिल्याच बैठकीत आमदार पाटील यांनी प्रशासनावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.