जत तालुक्यात पुरवठा विभागाकडे नवीन शिधापत्रिकेची मागणी करणे, विभक्त शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत आवश्यकतेनुसार नावे समाविष्ट करणे अथवा कमी करणे यासह अन्नसुरक्षा योजनेकरिता नागरिकांनी मध्यस्थी व दलाल यांचा आधार घेऊ नये. कोणालाही पैसे न देता थेट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले.
ते म्हणाले, नागरिकांची गैरसोय टाळावी या हेतूने पुरवठा विभागात ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यातून नागरिकांना वेळेत पारदर्शकपणे सुविधा दिली जाईल. शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे, दुबार रेशन काढणे तसेच अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाकरता विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या विहित कागदपत्रांसह अर्जदारांनी स्वतः उपस्थित राहून नमुन्यात अर्ज सादर करावेत. याकरिता त्रयस्थ व्यक्ती, दलाल यांच्याकडून कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
नागरिकांनीही एजंट व दलाल यांच्याकडे अशी कागदपत्र देण्याचे टाळावे. त्रयस्थ व दलाल व्यक्ती कार्यालयात वारंवार निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. पुरवठा विभागासह तहसील कार्यालयातील अन्य कामासाठी पैशाची मागणी केल्यास कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा.