वायफळेत भर चौकात धारधार शस्त्राने वार करून युवकाचा खून

0
1322

पाच जण गंभीर जखमी : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने कृत्य : कोयता, तलवारीचा वापर

   तासगाव तालुक्यातील वायफळे येथे पूर्ववैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला. हल्ल्यातील जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय 24 या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकाराने वायफळे येथे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.




  हल्ल्यातील जखमींची नावे अशी : संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार (सर्व रा. वायफळे, ता. तासगाव), आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे (दोघेही रा. कुची, ता. कवठेमहांकाळ).

   याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : वायफळे येथील फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती. भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते. दोन्ही कुटुंबातील एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

 

 गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता. हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता.

     दरम्यान, आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. 

   आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार (रा. वायफळे) यांच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला. त्यांच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे.

   दरम्यान, आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले. यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला. याचवेळी रोहितचे वडील संजय, आई जयश्री या मध्ये आल्या. त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्राने मारहाण केली. सर्वचजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर या टोळक्याने मोटरसायकल वरून धूम ठोकली. 

  या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे. सीसीटीव्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्ल्यातील सर्व जखमींना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा मृत्यू झाला. तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी जयश्री फाळके यांना रात्री उशिरा मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

   याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. दरम्यान, भर चौकात सिनेस्टाईल पद्धतीने झालेल्या या हल्ल्यामुळे वायफळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी तासगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम प्रयत्न करत आहे.

जखमी आदित्यचा आज वाढदिवस..!

  या हल्ल्यातील मयत रोहित फाळके यांच्या मामांची आदित्य व आशिष ही दोन मुले कालच वायफळे येथे आली होती. आज आदित्य याचा वाढदिवस आहे. सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचे नियोजन फाळके कुटुंबीयांचे होते. रोहित, आदित्य व आशिष हे सर्वजण वायफळे येथील बसस्थानक चौकात थांबले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here