जत : दुय्यम निबंधक तहसील कार्यालय येथे आले पण तेथे बसण्यास स्टॅम्प विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून न दिल्याने स्टॅम्प विक्रेत्यांनी सोमवारपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केले होते. बुधवारी आ. गोपीचंद पडळकर यांची स्टॅम्प विक्रेत्यांनी भेट घेतली. आ.पडळकर यांनी यावर तोडगा काढत स्टॅम्प विक्रेत्यांना तहसील कार्यालयात जागा उपलब्ध करुन दिली. गुरुवारपासून स्टॅम्प विक्री सुरू होणार आहे.यावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार व दुय्यम निबंधक यांची बैठक झाली.
बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, पण मुद्रांक विक्रेते यांनी जागेसंदर्भात लेखी आदेश द्या, अशी मागणी लावून धरल्याने बेमुदत बंद आंदोलन सुरूच राहिले. बुधवारी स्टॅम्प विक्रेत्यांनी आ. गोपीचंद पडळकर यांची भेट घेत त्यांना अडचण सांगितली.आ. पडळकर यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना त्वरित निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. आ. पडळकर यांच्या सुचनेनंतर प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्टॅम्प व्हेंडरसाठी जागा निश्चित करुन येथे जागाही ताब्यात दिली. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, प्रभाकर जाधव, गौतम ऐवळे उपस्थित होते.