सांगली : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, पैलवान कै. मारूती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेचा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आवाहन किरण गिऱ्हे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ (मुख्य कंपनी) सांगली या कार्यालयामार्फत एक लाख रूपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे.
सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, एक लाख रूपये थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. त्याची 2085/- रूपये च्या नियमित 48 समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.
नियम, अटी व अधिक माहितीसाठी महामंडळाचे सांगली जिल्हा कार्यालय, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, संभाजी नगर, दूरध्वनी क्रं. 0233-2376383 येथे संपर्क करावा.
00000