गोपीचंद पडळकर : मेंढ्यांच्या विशिष्ट जातीसाठी जीआय नामांकन मिळावे
जत : जत तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना दीडशे किलोमीटरचा प्रवास करून सांगलीला जावे लागते. एका फेऱ्यात काम होत नाही. लोकांचा वेळ, पैसा वाया जातो. बारामती, फलटण, कऱ्हाडला जसं कार्यालय निर्माण केले, तसंच जतसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.
माझ्या मतदार संघासह राज्यभारत मेंढपाळांची संख्या जास्त आहे. त्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी त्यांना चांगल्या प्रजातीचे नर व मेंढ्या देण्याची गरज आहे. जत विधानसभा मतदार संघात माडग्याळ मेंढी प्रसिद्ध आहे. ती एक लाखांपासून दहा लाखांपर्यंत आहेत. मात्र, जीआय मानांकन मिळणे गरजेचे आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने तात्काळ पाऊल उचलून जीआय मानांकन द्यावे. माडग्याळ मेंढीचं संशोधन करणे व पैदास केंद्र राज्य सरकारने स्थापन करावे, असे ते म्हणाले.
पडळकर म्हणाले, “राज्य सरकारने पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून एक चांगला निर्णय घेतला होता. मेंढपाळाना महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना व जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वन विभाग त्यांना मेंढ्या चरायला देत नाही म्हणून सरकारने चराई भत्ता जाहीर केला होता.
एका मेंढपाळाला सहा हजार रुपये व चार महिन्याचे चोवीस हजार देऊ केले होते. राज्यातील मेंढपाळांकडून भरपूर अर्ज आले आहेत. राज्यसरकारने निधीत वाढ करण्याची गरज आहे.”
ते म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या माध्यमातून सर्व कृषी पंप सौर उर्जेवर आणले आहेत. काही त्रुटी आहेत. शेतकऱ्यांची वीज वाया जाऊ नये, डीपी जळणे, तारा तुटणे यासह तांत्रिक गोष्टीचा फटका बसू नये यासाठी अप ग्रीड संकल्पनेतून कृषिपंप करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घ्यावा.”