कृषी विभागातील आगीचा प्रकार,तहसील कार्यालयही अलर्ट

0
59

जत : जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कृषी विभागाच्या गोडावूनला अज्ञातांनी आग लावल्याची घटना १२ डिसेंबर रोजी घडली होती. या आगीत कृषी विभागाचे २५ वर्षाचे सर्व रेकॉर्ड जळून खाक झाले. ही आग लागली नसून लावल्याची चर्चा सुरू असली तरी त्याचा तपास अद्याप गुलदस्त्यात आहे. कृषी विभागाचे रेकॉर्ड ठेवलेल्या गोडावूनला आग लागल्यानंतर जतचा महसूल विभाग खडबडून जागा झाला आहे.

जतच्या कृषी कार्यालयाला आग लागल्यानंतर सावधगिरी बाळगण्यासाठी जत तहसील कार्यालय व संख येथील अप्पर तहसिल कार्यालयात आता रात्री पहारेकरी म्हणून महसूल सेवक अर्थात कोतवाल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जतमध्ये आग कृषी विभागाला लागली व पहारा तहसिल कार्यालयाला सुरू झाला आहे. कार्यालयाच्या सुरक्षेचा भार अधिकाऱ्यांवर नव्हे तर, एकट्या कोतवालावर टाकण्यात आला आहे.

महसूलच्या या आदेशाने कोतवालात नाराजीचा सूर आहे. १३ जानेवारीपासून रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत एका कोतवालाची नियुक्ती पहारेकरी म्हणून तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी यासंदर्भात आदेश पारित केला आहे.त्या आदेशात तहसिलदारांनी नमूद केले आहे की, जत तहसील कार्यालयातील सर्व शाखेचे ऑफिस दफ्तर तसेच जत तालुका व अपर संख तहसील यांचे सर्व खातेदारांचे सर्व प्रकारचे जमिनीचे दफ्तर, जन्म मृत्यु नोंदीचे जुने अभिलेख दफ्तर अभिलेख कक्षामध्ये ठेवण्यात आले आहेत तसेच जत तहसील कार्यालयामधील सर्व शाखेत सर्व संकलनाचे चालू दफ्तर, कॅश बुक व जुने दफ्तर आहेत.

आपल्या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची चोरी किंवा गैरप्रकार घडू नये यासाठी रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत प्रशासकीय इमारतमध्ये दफ्तराची सुरक्षितता व संरक्षणसाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक आहे. तरी प्रशासकीय इमारतीमधील ऑफिसचे सर्व दफ्तर व इतर ऑफिसमधील साहित्याचे सुरक्षितेच्या दृष्टीने संरक्षणसाठी १३ डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत महसूल सेवक (कोतवाल) यांच्या या आदेशान्वये नेमणूक करण्यात आल्या आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here