सांगलीत ‌ACB च्या दोन कारवाया,तिघावर गुन्हा

0
93

पोलीस नाईक,एका शिक्षकासह लिपिक लाच घेताना जाळ्यात

सांगली : सांगली जिल्ह्यात लाचलुपत विभागाने दोन कारवाई करत तिघा लाचखोरांना ताब्यात घेतले.एका  प्रकरणात पोलीस नाईक यांनी २५ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी तर दुसऱ्या प्रकरणात पत्र बिल मंजूर करण्यासाठी १ लाख १० हजाराची लाच घेताना एक शिक्षक व लिपिक जाळ्यात सापडले आहेत.

इचलकरंजीतील बांधकाम साईटवर झालेल्या अपघातप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच जखमी बालकाचा जबाब कंत्राटदाराच्या बाजूने घेण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

शेखर जयवंत पाटणकर (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदाराने इचलकरंजी येथील एका इमारत बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. दि. ७ डिसेंबर रोजी इचलकरंजीतील बांधकामाच्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा त्याच्या नातेवाईकांना भेटायला गेला होता. त्यावेळी तेथे झालेल्या अपघातात तो मुलगा आणि त्याचे नातेवाईक जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगलीतील भारती रूग्णालयात उपचार सुरू होते. या तक्रारदाराविरोधात अपघातात बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या मुलाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पाटणकर याने त्यांच्याकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारानी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

या तक्रारीची दि. १० डिसेंबर रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत शेखर पाटणकर याने २५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सोमवारी पाटणकर याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान महिला शिक्षकाचा दोन वर्षाचे तीन पगार काढण्यासाठी एकूण रकमेच्या सहा टक्के असणारी १.१० लाख रूपये लाच मागितल्याप्रकरणी हिंद एज्युकेशन सोसायटीच्या नरवाड येथील न्यू इंग्लीश स्कूलचे शिक्षक आणि याच संस्थेच्या सोनी येथील न्यू इंग्लिक स्कूलमधील लिपीकाविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

शिक्षक उमेश मारूती बोरकर (वय ३६, रा. कवठेएकंद), लिपीक युवराज मनोहर कांबळे (वय ५६, रा. बेडग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांची पत्नी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय तसेच विलिंग्डन महाविद्यालयात संस्कृत विषय शिकवण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. या दोन्ही आस्थापनांकडील दोन वर्षाचे १९ लाख ४५ हजार ७१० रूपये रकमेचे तीन पगार बिले दोन्ही महाविद्यालय प्रशासनाने मंजुरीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कार्यालयाकडे पाठवली होती.

ती काढण्यासाठी बोरकर यांनी एकूण रकमेच्या सहा टक्के म्हणजेच १.१० लाख रूपये द्या बिले पे युनिटमधून मंजूर करून आणून देतो सांगितले होते. त्यावेळी तक्रारदार आणि बोरकर यांच्या चर्चेत सहभागी होऊन तक्रारदारांना लाच देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत स्पष्ट झाले. या प्रकरणात लाच मागणीची तब्बल आठवेळा पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये बोरकर आणि कांबळे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, पोपट पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here