तासगाव तालुक्यातील कृषी दुकानदारांनी नाचविल्या बारबाला

0
6

*पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : तासगाव, मनेराजुरी, चिंचणीच्या दुकानदारांचा समावेश : बारबालांसमोर केले विभत्स नृत्य

तासगाव : तासगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र दुकानदारांनी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलार येथील हॉटेल हिराबागमध्ये बारबारांसोबत रंगीत – संगीत पार्टी केली.नाचणाऱ्या बारबालांसोबत विभत्स नृत्य केले. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात तासगाव, चिंचणी व मनेराजुरी येथील पाच दुकानदारांवर गुन्हा दाखल झाला आहे.

       

या हॉटेलमध्ये बारबाला नाचणाऱ्या तब्बल 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. सागर प्रभाकर जाधव (वय 36, रा. मनेराजुरी), ऋषिकेश संभाजी अवताडे (वय 26, रा. तासगाव), संतोष सुनील पाटील (वय 28, रा. तासगाव), महेश मोहन पाटील (वय 40, रा. चिंचणी), हणमंत रंगराव गायकवाड (वय 39, रा. चिंचणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

       

याबाबत माहिती अशी :  तासगावसह विविध भागातील कृषी दुकानदारांनी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलार येथील हिराबाग या हॉटेलमध्ये आपले रंग उधळले. या हॉटेलमध्ये बारबाला नाचायला आणल्या. बारबालांसोबत या कृषी दुकानदारांनी विभत्स नृत्य केले. अनेक कृषी दुकानदार दारू ढोसून तर्र होते. 

     

या दुकानदारांचा बारबालांसोबत अक्षरशः धिंगाणा सुरू होता. दारूच्या नशेत त्यांनी नुसता धुडगूस घातला. बेधुंद झालेल्या या दुकानदारांनी बारबालांभोवती गरळ गाळण्यास सुरुवात केली होती. बारबालांच्या अदाकारीवर ठुमका मारणारे दुकानदार अक्षरशः घायाळ झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही रंगीत पार्टी सुरू होती.

       

याबाबत पाचगणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी हिराबाग या हॉटेलवर छापा टाकला. पोलिसांचा छापा पडताच खळबळ उडाली. कृषी दुकानदार व बारबाला सैरावैरा पळू लागले. मात्र पोलिसांनी बारबालांसह कृषी दुकानदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अनेक दुकानदारांची अक्षरशः बोबडी वळू लागली.

       

आपल्या अब्रूचे धिंडवडे निघणार या विचाराने कृषी दुकानदारांना चढलेली दारू क्षणात उतरली. मात्र दारूची नशा उतरल्यानंतरही हे दुकानदार तंदरीतच होते. त्यानंतर सर्व दुकानदारांना पाचगणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तर पोलिसांनी बारबालांचे समुपदेशन केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये तासगाव तालुक्यातील मनेराजुरी, चिंचणी व तासगाव येथील पाच जणांचा समावेश आहे. याप्रकरणी तब्बल 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

       

अनेकांच्या अलिशान गाड्या व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील कृषी दुकानदारांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. या दुकानदारांना आपापल्या गावात तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर मिळवलेल्या पैशातून सुरू असणारी ही अय्याशी पाहून बळीराजा चांगलाच संतापला आहे.

बारबालांची जुळणी करून देणारा कवठेएकंद येथील?

     

भिलार येथील हिराबाग हॉटेलमध्ये बारबालांना नाचवून कृषी दुकानदारांना खुश करणारा मोरक्या तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील असल्याचे समजते. संबंधित व्यक्ती द्राक्ष बागातदारांना ‘कन्सल्टिंग’ करत असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या माथी विविध उत्पादने मारून त्यातून मिळवलेल्या लाखो रुपयांतून संबंधित ‘कन्सल्टंट’ व कृषी दुकानदारांची ‘थेरं’ सुरू असतात. ज्यावेळी भिलार येथील हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा पडला त्यावेळी कवठेएकंद येथील संबंधित ‘कन्सल्टंट’ उपस्थित होता. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागतात संबंधिताने संधी साधून तेथून पलायन केले. मात्र त्याचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले आहे. लवकरच पोलिसांचा फास या म्होरक्याच्या गळ्याभोवती आवळेल, अशी चर्चा आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here