जत : जत नगरपरिषद हद्दीतील बचत भवन ते आनंदराव वाघमोडे या मार्गावरील संभाजी तुराई घर ते संभाजी भोसले घरापर्यंतच्या डांबरी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून चालने धोक्याचे झाले आहे.हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा,अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
शहरातील बचतभवन ते आनंदराव वाघमोडे घरापर्यंत यापूर्वी डांबरीकरण रस्ता करून अनेकवर्षे होत आली असून यापैकी संभाजी तुराई घर ते संभाजी भोसले घरापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
संभाजी तुराई यांच्या घराजवळ व डाॅ.प्रणय कुलकर्णी यांच्या घराजवळ मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्यावर पडलेल्या खड्यात आतापर्यंत अनेक वाहनचालक पडून जायबंदी झाले आहेत. हा रस्ता कुंभार प्लाॅट,बसवेश्वर नगर,शिक्षक काॅलनी,विद्युत नगर,दुधाळवस्ती येथील रहिवाशांच्या नित्य वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर दररोज शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने जा ये करतात.या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर मंजूर होऊन ते सुरू झाले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा येथिल नागरिकांनी दिला आहे.