१९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी !

0
55


भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध टी २० मालिका खेळत आहे त्यामुळे संपूर्ण देशाचे आणि मीडियाचे लक्ष त्या संघाकडे लागले असतानाच भारतीय महिला क्रिकेटचा १९ वर्षाखालील संघ मलेशियातील क्वालालंपूर येथे टी २० चा विश्वचषक खेळतोय हे माहीत असणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे आणि ते साहजिकच आहे कारण आपल्या देशात पुरुषांच्या क्रिकेट संघावर जीव ओवाळून टाकणारे जितके लोक आहेत त्याचा दहा टक्के लोक देखील महिला क्रिकेट पाहत नाही. महिला क्रिकेटला भारतात कधीच गांभीर्याने घेतले जात नाही. याला मीडियाही अपवाद नाही.

मीडिया पुरुष क्रिकेटला जितकी प्रसिद्धी देतात त्याच्या दहा टक्केही प्रसिद्धी ते महिलांच्या क्रिकेटला देत नाही. महिला क्रिकेट संघाच्या सामान्यांना टीव्हीवर थेटपणे दाखवले जात नाही. महिला क्रिकेट संघाला प्रायोजकही मिळत नाही असे असतानाही महिला क्रिकेटपटू मात्र आपले काम इमाने इतबारे करून देशाचा गौरव वाढवण्याचा प्रयत्न करतात. आता हेच पहा ना पुरुषांची इंग्लंड विरुद्ध द्विपक्षीय मालिका चालू असताना भारत या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र मलेशियातील क्वालालंपूर येथे माहिलांचा १९ वर्षाखालील टी २० चा विश्वचषक चालू होता हे किती लोकांना माहीत होते ? याच विश्वचषक स्पर्धेत भारताच्या १९ वर्षाखालील महिलांनी अजिंक्यपद मिळवून विश्वक्रिकेटवर आपली मक्तेदारी सिद्ध केली. क्वालालंपूरच्या बायुमास ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या १९ वर्षाखालील महिलांनी जबरदस्त खेळ करत दक्षिण आफ्रिकन महिला संघाचा धुव्वा उडवत विश्वचषकावर भारताचे नाव कोरले.

अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी जबरदस्त गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ८२ धावत गुंडाळून अवघ्या ११.२ षटकात ८४ धावा काढून ९ गडी राखत एकतर्फी विजय मिळवला. अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी एकहाती वर्चस्व गाजवले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारतीय महिलांनी हुकूमत गाजवून दक्षिण आफ्रिकन महिलांना दाती तृण धरायला लावले. हा सामना जिंकून भारतीय महिलांनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. कोणत्याही स्तरावरील भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे केवळ दुसरे विश्वविजेतेपद आहे. याआधीच्या म्हणजे २०२३ साली झालेल्या १९ वर्षाखालील महिलांच्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या १९ वर्षाखालील मुलींनी इंग्लंडचा पराभव करून विश्वविजेतेपद मिळवले होते. सलग दोनदा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या भारताच्या या १९ वर्षाखालील मुलींची ही कामगिरी ऐतिहासिक अशीच आहे. विशेष म्हणजे भारताच्या वरिष्ठ महिला संघाला अजूनही अशी कामगिरी करता आलेली नाही . भारताच्या वरिष्ठ महिला संघाने एकदिवसीय व टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता मात्र दुर्दैवाने त्या संघाला विश्वविजयाला गवसणी घालण्यात अपयश आले होते मात्र भारताच्या या युवा महिला खेळाडूंनी ही अशक्य वाटणारी कामगिरी शक्य करून सर्वानाच चकित केले आहे. भारताच्या या १९ वर्षाखालील महिला संघाची ही कामगिरी ऐतिहासिकच आहे.

भारताच्या या युवा महिला खेळाडूंच्या या कामगिरीचा देशातील १४४ कोटी जनतेला सार्थ अभिमान आहे. महिला क्रिकेटसाठी हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. महिला क्रिकेटला उर्जितावस्था देणारा हा विजय आहे. पुरुष क्रिकेटमध्ये जे कपिल देवच्या संघाने १९८३ साली केले होते तेच निक्की प्रसादच्या या संघाने करून दाखवले आहे. सलग दुसऱ्यांदा टी २० चा विश्वचषक जिंकून भारताच्या या युवा महिलांनी इतिहास घडवला आहे. भारताच्या या युवा खेळाडूंनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. वास्तविक भारताच्या वरिष्ठ महिला संघाने देखील देशासाठी अनेकदा अप्रतिम कामगिरी केली आहे असे असूनही भारतीय महिला क्रिकेटला देशात अजूनही गांभीर्याने घेतली जात नाही. जितकी लोकप्रियता पुरुषांच्या क्रिकेटला मिळते तितकी महिला क्रिकेटला मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. या विजेतेपदानंतर तरी देशात महिला क्रिकेटला गांभीर्याने घेतले जाईल अशी आशा करूया. सलग दुसऱ्यांदा टी २० च्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून इतिहास घडवणाऱ्या १९ वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन! जय हो!!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here