हभप तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा | युवा प्रशिक्षणार्थीच्या महामोर्चाला १० हजार युवकांची उपस्थिती
जत : राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत काम करणाऱ्या युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यभरातील दहा हजार युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते. यवतमाळचे माजी खासदार हरिभाऊ राठोड, हभप तुकाराम बाबा महाराज, अनुप चव्हाण, शिरीषकुमार नाईक, रमेश भुतेकर यांच्यासह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
★ बाबा व पोलिसांत शाब्दिक चकमक
आझाद मैदानावर महामोर्चा धडकताच याठिकाणी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती केली आहे तेथे कायम करावे, शासकीय सेवेत युवा प्रशिक्षणार्थी यांना १० टक्के आरक्षण द्यावे अशी आग्रही मागणी यावेळी तुकाराम बाबा महाराज यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी यांनी आग्रहाने मांडली. महामोर्चाला रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पण मोर्चेकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तुकाराम बाबा व पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आमचा मोर्चा शांततेत सुरू आहे पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यावी अन्यथा रस्ता जाम करण्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी देताच पोलिसांनी सहकाऱ्यांची भूमिका घेतली.
★ मंत्र्यांची घेतली भेट
तुकाराम बाबा यांनी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोंढा यांची भेट घेतली त्यांनी सकारात्मक उत्तर न देता हा माझा विषय नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटा असे सांगितले. राज्याचे मंत्री, संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचीही भेट घेतली. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांना तुकाराम बाबांनी संपर्क साधून प्रशिक्षणार्थी यांच्या भावना तीव्र असून त्यांना न्याय देण्याची मागणी केली. मंत्री गोगावले यांनी याविषयी आपण मुख्यमंत्री यांची आपली भेट घालून देतो असे आश्वासन दिले.
★ तुकाराम बाबा झाले आक्रमक
महामोर्चानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तुकाराम बाबा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना शासन युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांबाबत सकारात्मक नसल्याबद्दल खंत व्यक्त करत पुढील आंदोलनाची दिशा आक्रमक असेल असा इशारा दिला. यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, निवडणुकीच्या अगोदर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी मेघा भरती केली. सहा महिन्यांची मुदत संपताच त्यांना घरचा रस्ता दाखविला जात आहे. सहा महिने पोटभरून वाढले व आता हातातील भाकरीच शासन हिसकावून घेत आहे. हे चुकीचे आहे. राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा बाबांनी यावेळी दिला.
■ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी सध्या पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर, ए.एस.एम नर्स पदावर काम करत आहेत. या योजनामुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. सहा महिन्याचे प्रशिक्षणा पूर्ण केल्यानतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्याना तिथेच कायमस्वरूपी नौकरी, रोजगार मिळणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावालाही आधार देऊ अशी ग्वाही दिली होती. या तरुणांचा सहानुभूतीने विचार व्हावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.