करजगीत धक्कादायक प्रकार | चिमुरडीचा अत्याचारानंतर निर्घृण खून

0
21

जत/करजगी : करजगी (ता. जत) येथे एका चार वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपविल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पांडुरंग सोमनिंग कळ्ळी (वय ४५, रा. करजगी) याला उमदी पोलिसांनी तत्काळ अटक केली. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संपूर्ण राज्यात या घटनेचे प्रतिसाद उमटले असून संपूर्ण जत तालुका शुक्रवारी बंद पुकरण्यात आला आहे. त्याचबरोबर आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी मुलगी आजी- आजोबा सोबत राहत होती, तर तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला आहेत.घराशेजारीच पांडुरंग कळ्ळी हा आईसह राहत होता.तो मजुरी करत होता. त्याच्या घरासमोरच बदामाचे झाड आहे. गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास बालिका खेळत-खेळत बदाम घेण्यासाठी पांडुरंगच्या घरासमोर आली. तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले.त्यानंतर पत्रा शेडमध्ये तिला घेऊन गेला.त्याठिकाणी कोणी नसल्याचे पाहून पांडुरंगने तिच्यावर बलात्कार करून खून केला. खुनानंतर कोणाला प्रकार निदर्शनास येऊ नये म्हणून तिला पोत्यात टाकून मृतदेह लोखंडी पेटीत लपवला.

दरम्यान, नात बराच वेळ कुठे दिसत नाही म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली.चौकशी करताना शेजारील पांडुरंग याने तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली.तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेडसमोर झोपल्याचे निदर्शनास आले.त्याला नातीबद्दल विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले.तसेच त्याने लोकांबरोबर बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचा बहाणा केला. 

तेवढ्यात काही लोकांनी उमदी पोलिस ठाण्यात चार वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याचे फोन करून सांगितले होते. उमदी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.बालिकेचा शोध घेत असताना पांडुरंग याच्याबरोबर तिला पाहिल्याचे काहींनी सांगितले.शोधाशोध करताना लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून टाकल्याचे निदर्शनास आले.पांडुरंग याला तत्काळ ताब्यात घेऊन उमदी पोलिस ठाण्यात आणले.बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत येथे पाठविण्यात आला.

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तसेच उमदी पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.

नराधमावर कठोर कारवाई करा

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून खून केल्यानंतर तिच्या आजी-आजोबांना धक्का बसला.तत्काळ तिच्या आई-वडिलांना बोलाविण्यात आले. गावात तणावाचे वातावरण आहे.नराधम पांडुरंग कळ्ळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जत बंदची हाक

बालिकेच्या खुनानंतर सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत.करजगी ग्रामस्थांनी शुक्रवारी जत तालुका बंदची हाक दिली आहे. त्यामुळे जत शहरासह करजगी गावात बंदोबस्त ठेवला आहे.

फक्त संशयिताचा फोटो वापरा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here