पान, मावा, गुटख्यावर मारतात गांजाचे पाणी | जत पानपट्ट्यांकडे शाळकरी विद्यार्थ्यांच्या रांगा

0
211

जत : जत शहरातील अपवाद वगळता पानपट्टीतून सर्रास पानामध्ये, मावा व गुटख्यातून गांजाचे पाणी मिसळून विकले जात असल्याची चर्चा आहे. या पानपट्ट्यांकडे शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात का येतात? असा प्रश्न आहे. शहरात अन्नभेसळ विभाग, पोलिस प्रशासन तसेच पालकांनी विशेष लक्ष देऊन शालेय विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

शाळा सुटते व भरतेवेळी शहरातील चौका-चौकातील पानपट्ट्यांमध्ये बहुसंख्य शाळकरी विद्यार्थी गुटखा, मावा व पान खाण्यासाठी जमा झालेले दिसतात. त्याचप्रमाणे शहरातील प्रतिष्ठीत समजला जाणारा वर्गही जत शहराशेजारील वनीकरण विभागाचा आसरा घेऊन नशापान करताना दिसतात. मध्यंतरी गांजाच्या आहारी गेलेल्या एका युवकाने नशेत येथील एका खासगी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. लहान लहान मुलेही अलीकडे सिगारेट ओढणे, उत्तेजित कोल्ड्रिंक एकावेळी दोन दोन पिणे, असले प्रकार करू लागलेत.

जत शहरातील वाढत्या व्यसनाधिनतेला प्रशासनाप्रमाणेच पालकही तितकेच जबाबदार आहेत. कारण आपला मुलगा काय करतो, कोणाच्या संगतीत असतो याकडे पालकांचे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थी मोठ्याप्रमाणात व्यसनाकडे वळताना दिसत आहेत. शाळांनी वर्गामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले पाहिजे, असा सूर जाणकार लोक व्यक्त करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here