सारा शिंदे पहिली तर अग्रणी पाटील दुसरी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय परीक्षेत नावलौकिक*
तासगाव : तालुक्यातील दहिवडी येथील ब्लॉसम प्रायमरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवले. या शाळेतील दुसरीत शिकणाऱ्या सारा सचिन शिंदे हिने प्रथम तर अग्रणी अमोल पाटील हिने दुसरा क्रमांक मिळवला. राष्ट्रीय पातळीवरील या परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीही नावलौकिक मिळवत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
दहिवडी येथील फोंड्या माळरानावर उभारलेल्या ब्लॉसम प्रायमरी स्कुलमध्ये दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. शालेय शिक्षणाबरोबरच इतर अनेक अतिरिक्त उपक्रमही शाळेत घेतले जातात. सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढे ठेवण्याचा शाळेचा प्रयत्न असतो. त्यामुळे विविध मैदानी स्पर्धा व शैक्षणिक परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी नेहमीच चमकत असतात.
नुकत्याच झालेल्या नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत या शाळेत दुसरीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले. या शाळेतील सारा सचिन शिंदे हिने 100 पैकी 98 गुण मिळवून प्रथम तर अग्रणी अमोल पाटील हिने 100 पैकी 97 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका दीपाली पाटील, प्रियांका पाटील, स्वाती कोळी, सुविधा पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.