जत : जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमुळे जत तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपींला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. शुक्रवारी रात्री सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. पूजा पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
खा. विशाल पाटील म्हणाले, घटना केवळ जत ही तालुक्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारी आहे. आज एका निष्पाप मुलीचे प्राण गेले. आरोपींला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवला जावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे.
खा. विशाल पाटील यांनी रात्री उशिरा जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांची भेट घेऊन सदर घटनेबाबत सविस्तर चर्चा करून पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.