महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र चिंचली मायाक्कादेवीची दि.१२ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत यात्रा,लाखो भाविकांना कानड्या लाडीच्या दर्शनाची लागली ओढ लागली आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू,गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री.क्षेत्र चिंचली मायाक्का देवी ही नवसाला पावणारी व जागृत अशी सर्वदूर ख्याती असलेले देवस्थान आहे.
दरवर्षी श्री.क्षेत्र चिंचली येथे मोठ्याप्रमाणात ही यात्रा भरते.यावर्षी ही यात्रा बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी ते रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत भरविण्यात येणार असून या यात्रेतील मुख्य दिवस हा रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२५ हा असून या दिवशी देविला बोनी दाखविणेचा ,महानैवैध्याचा व देवीच्या पालखी फेरीचा दिवस आहे.
श्री.क्षेत्र चिंचली येथील मायाक्का देवीचे मंदिर हे कर्नाटक राज्यात असल्याने व देवीला महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील भाविकभक्त मोठ्या श्रध्दा व भक्तीभावाने दर्शनासाठी जात असल्याने या देवीला कानडी लाडी असेही म्हणतात.
या यात्रेला निघण्यापूर्वी भाविकभक्त यात्रेपूर्वी एक महिना तयारीला लागतात.घराची गोमूत्र शिंपडून संपूर्ण स्वच्छता,यात्रेसाठी बैलगाडी तयार करणे ,बैल धुवून स्वच्छ करणे,त्यांना रंगवीणे,बैलजोडी व बैलगाडी सजविणे अशी कामे भाविकभक्त करतात.
या यात्रेला जास्तीतजास्त भाविकभक्त हे पूर्वीपासूनच बैलगाडीने जात असतात आताही ही परंपरा चालूच आहे.परंतु काळानुसार बदल होत चालला असून या यात्रेला गावागावांतून एस.टी.महामंडळाच्या बसेस खास यात्रेसाठी अरक्षित करून त्या श्री.क्षेत्र चिंचली येथे पाठवून भाविकभक्त देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीचे दर्शन घेऊन परततात.
लाखो भक्तगण चारचाकी,आठचाकी,बाराचाकी व मोठमोठ्या कंटेनरवर लाऊडस्पीकर लावून त्यावर कानड्या लाडीची गाणी मोठमोठ्या आवाजात लावून तसेच महिला भगिनी या माईकवर देवीची गाणे म्हणून जाताना दिसतात.
या यात्रेला जाताना प्रत्येक भाविकभक्त अथणीजवळील कृष्णानदीत ( हल्ल्याळ ) नदित हातपाय धुवुन व स्नान करूनच पुढे जातो.
या यात्रेकरिता पुणे ,मुंबई, गोवा येथून मोठ्याप्रमाणात भाविकभक्त स्पेशल ट्रॅव्हल्स करून येतात.त्याच प्रमाणे यात्रा कालावधित श्री.क्षेत्र चिंचलीकडे येणा-या सर्व रेल्वे या भरगच्च भरलेल्या असतात.
जत येथील श्री.भाग्यवंतीदेवी व श्री.मायाक्का देवीचे पुजारी श्री.बसवराज अलगुर महाराज, सौ.सुवर्णाताई अलगूर ह्या देवीची पालखी मोठ्या गाडीमध्ये ठेवून आपल्याबरोबर शेकडो भाविकभक्तांना घेऊन दरवर्षी श्री.चिंचली मायाक्कादेवीच्या दर्शनासाठी जात असतात. या ठिकाणी त्यांच्या पालखीला विशेष असे स्थान आहे.ही पालखी मंदिरात नेऊन श्री.मायाक्का देवीची भेट घडवून आणली जाते यावेळी देवीची खणानारळाने ओटी भरून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविल्यानंतर ही पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून एकदिवस मुक्काम करून परत आणली जाते.
श्री.क्षेत्र चिंचली श्री.मायाक्कादेवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध भागातून वाहनाने येणा-या भाविकांकडून महाराष्ट्रातील सर्वच टोलनाक्यावर टोल न घेण्याची विनंती महायुती सरकारला लेखी पत्र देऊन रा.स.प.चे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री श्री.महादेवराव जानकर व जतचे भा.ज.पा.आमदार श्री.गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
या यात्रेचा प्रमुख दिवस रविवार दिनांक. १६ फेब्रुवारी २०२५ हा असलातरी ही यात्रा जवळ जवळ एक महिना सुरू राहते.