सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील

0
127

                                           

      

सांगली : सांगली जिल्ह्यात विविध माध्यमातून नवीन उद्योग प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांच्या अडीअडचणी टप्प्याटप्प्याने सोडवू, अशी ग्वाही उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे दिली.

         

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्यावतीने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व व्यापार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड. अँड अग्री चे अध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. च्या संचालिका नीता केळकर, दीपक शिंदे, रवींद्र माणगावे, रमाकांत मालू आदि मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.

         

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, हळदीनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीत वसमत येथील हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र करण्यासाठी लवकरच बैठक घेऊ. तसेच संरक्षण सामग्री उद्योग प्रकल्पही सांगलीत आणण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

          उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, सांगली एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते, दिवा बत्ती व पाण्याची सुविधा महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. एमआयडीसी क्षेत्रातील अत्यावश्यक सुविधांसाठी एमआयडीसी विभाग, महानगरपालिका व शक्य झाले तर जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल. कवलापूर विमानतळाच्या बाबतीत निकषांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचा अहवाल आल्यानंतर उचित निर्णय घेण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील ड्रायपोर्टचा प्रश्न सकारात्मक पध्दतीने सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठी एमआयडीसी करण्याचा निर्णय शासनाच्या उद्योग विभागाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवड व त्या परिसरातील जमीन संपादित करून ही एमआयडीसी झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात फार मोठी औद्योगिक क्रांती होवू शकते. आपल्या भागात आर्थिक परिवर्तन घडविण्यासाठी जिल्ह्यात नवीन येणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले पाहिजे, उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

         

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते कामांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून कामे करण्यासाठी प्रयत्न करू. उद्योजकांना कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता असते. नवनवीन उपक्रम, शोधामुळे जग श्रीमंत झाले. त्यामुळे आपल्यालाही त्या दिशेने जावयाचे आहे. उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहोत. संशोधनासाठी प्रयत्न करीत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग जगत व प्रामुख्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरींग यांनी परस्पर समन्वयाने बैठक घेऊन आवश्यक मनुष्यबळ विकसीत करण्यासाठी अभ्यासक्रम विकसीत करावेत, असे ते म्हणाले.

         

आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यात मोठा उद्योग जिल्ह्यात आला पाहिजे. त्यामुळे जिल्ह्यात किमान 25 ते 30 हजार छोटे, मोठे उद्योजक तयार होतील. परराष्ट्रातून येणाऱ्या गुंतवणूकीचा काही भाग सांगलीतील उद्योग विकासासाठी वापरता येईल. नवीन उपक्रमासाठी उद्योग खात्याने इंजिनिअरींग कॉलेजशी जास्त संवाद ठेवला पाहिजे. त्यांच्या गरजा मांडाव्यात. त्यामुळे विविध प्रयोग होवून प्रगती होईल, असे ते म्हणाले.

         

यावेळी ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या माध्यमातून उद्योजकांच्या अनेक अडीअडचणी, प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांची सोडवणूक केली आहे. यावेळी त्यांनी उद्योजकांचे अनेक प्रश्न मांडले. उद्योजकांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

         

यावेळी नीता केळकर, प्रविण लुंकड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. उद्योजक रविंद्र मानगावे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रियांका कार्लेकर यांनी केले. कार्यक्रमास उद्योजक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

             सांगली, दि. 10 ,(जि.मा.का.) : महाराष्ट्र औद्योगिक विकास  महामंडळाकडून ज्या प्रयोजनासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे, तो उद्योग चालू करण्याबाबत एक महिन्याच्या आत कार्यवाही करावी, अन्यथा भूखंडाचा पंचनामा करुन भूखंड बांधकामासह महामंडळाच्या ताब्यात परत घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

          महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांची पाहणी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने माहे मार्च २०२४ मध्ये बंद उद्योग घटकांना उद्योग चालू करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, अद्यापही काही उद्योग घटकांकडून भूखंडावर उद्योग चालू केल्याचे दिसून येत नाही. तसेच काही बंद उद्योग घटकामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचे निदर्शसनास आलेले असून व भूखंडावर बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आलेले आहे. अशा उद्योग घटकांच्या बाबतीत कडक कारवाई करण्यात येणार असून, उद्योग घटकाचे मालक सर्वस्वी जबाबदार राहतील व पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

          अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.      

०००००

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here