सांगली : ग्रामीण भागाची अर्थवाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या दहा शाखांना भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. आणखी १५ शाखा विस्तारण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात बँकेची स्थिती सुधारल्याने पंचवीस वर्षानंतर ही परवानगी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
यावेळी संचालक तानाजीराव पाटील, एम.डी. शिवाजी वाघ उपस्थित होते. नव्या शाखांमध्ये मल्लेवाडी (मिरज), कुकटोळी (कवठेमहांकाळ), गुड्डापूर (जत),ढवळी(तासगाव),बनपुरी(आटपाडी),बलवडी-भाळवणी (खानापूर), शिरगाव(वाळवा),तुपारी फाटा (पलूस), हणमंतवडीये (कडेगाव), येळापूर (शिराळा) या दहा शाखांचा समावेश आहे.नाईक म्हणाले, जिल्हा बँकेच्या २१८ शाखा असून नव्याने १० शाखांना परवानगी मिळाली आहे. या दहा गावांतील शाखांमुळे गावात सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.