सांगली : शेअर मार्केटमध्ये दाखवून दोघांना तब्बल एक कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अनिल बाबुराव पाटील (रा. सांगली) यांनी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अशुतोष प्रकाश कासेकर (रा. राधा रेसिडेन्सी, रामदेव पार्क, मुंबई पूर्व), पूनम भीमराव भोसले ऊर्फ जाधव (रा. १०० फुटी रस्ता, सांगली) आणि कुणाल सुरेश मिस्त्री (रा. मंगळवार पेठ, शिरोली पुलाजवळ, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संशयितांनी फिर्यादी अनिल पाटील व त्यांच्या नातेवाईक शोभा शिवगोंडा जैनावर यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले.
सुरुवातीला दोघांनी काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली. त्यावेळी संशयितांनी त्यांना थोडा परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयितांनी दोघांची बैठक घेतली. यावेळी शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले.त्यानुसार अनिल पाटील व शोभा जैनावर यांनी संशयितांच्या शेअर मार्केट कंपनीमध्ये एक कोटी ४७ लाख ८७ हजारांची गुंतवणूक केली. गुंतवलेल्या रक्कमेतील १५ लाख रूपये दोघांना परत दिले. त्याचा परतावा म्हणून १९ लाख १५ हजार रुपयांची रक्कम देखील परत दिली. परंतु उर्वरित एक कोटी ३२ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे अनिल पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
टोळी सक्रिय
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. सांगलीत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांची टोळी काही वर्षांपूर्वी सक्रिय होती. यापूर्वी काही जणांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा तब्बल एक कोटी ३२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगलीत शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारऱ्या टोळ्या अद्याप सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे