- नुतन जिल्हाधिकारी अशोक काकडे
- सांगली : जिल्ह्यात प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणतानाच लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी प्रयत्न असतील. तसेच, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे (भा. प्र. से.) यांनी आज येथे दिली.
सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (भा. प्र. से.) यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते. आपणास सांगलीतील कामाचा पूर्वानुभव असून, जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात अधिक चांगले काम करू, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे सारथी, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत होते. तिथून त्यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे हे सन 2010 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. श्री. अशोक काकडे यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड, महिला व बालकल्याण आयुक्त, पुणे येथे म्हाडाचे संचालक या पदांवर काम पाहिले आहे.
तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सन 2003 ते 2006 या कालावधीत निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली या पदावर काम केले असून, सांगलीतील दुष्काळ, महापुराच्या आठवणी व त्यावेळी केलेल्या सर्वोत्तम कामांच्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.