सर्कलच्या नावाने मागितली लाच : जमिन खरेदीची नोंद करण्यासाठी 2 हजारांची मागणी
तासगाव तालुक्यातील राजापूर येथील तलाठी सुजाता आण्णाप्पा जाधव यांनी जमिनीची नोंद घालण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांच्या नावावर व स्वतःसाठी 2 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर येथील एकाने याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी : राजापूर येथील एकाने जमीन खरेदी केली होती. त्याची नोंद सातबारावरती करण्यासाठी त्यांनी तलाठी सुजाता कदम यांच्याकडे अर्ज केला होता. ही नोंद सातबारावर करण्यासाठी तलाठी कदम यांनी तासगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरुवातीला मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने 3 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. 11 फेब्रुवारी रोजी या लाच मागणीची खातरजमा केली. त्यावेळी तलाठी कदम यांनी तासगाव तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 2 हजार रुपयेवर सौदा ठरला.
याप्रकरणी तलाठी सुजाता कदम यांच्या विरोधात लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘त्या’ सर्कलचीही होणार चौकशी..!
राजापूरच्या तलाठी सुजाता जाधव यांनी मंडल अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितली होती. याप्रकरणी 'त्या' सर्कलचीही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार आहे.