तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी कोणतीही रजा न काढता आज शाळेला 'दांडी' मारली. मुख्याध्यापक विद्या मिरजकर यांच्यासह दीपाली भोसले, दीपक माळी हे शिक्षक आज गैरहजर होते. तर गावातील सरिता कदम या खासगी महिलेने आज सकाळी शाळा उघडली होती. मात्र सकाळी 7.20 ते 10 पर्यंत ही शाळा शिक्षकाविना सुरू होती. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी गंभीर दखल घेतली आहे. तीनही कामचुकार शिक्षकांवर कारवाई होणार आहे.
याबाबत माहिती अशी : बस्तवडे येथे पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 65 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेत विद्या मिरजकर या मुख्याध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्यासोबत दिपाली भोसले व दीपक माळी हे दोन शिक्षक कार्यरत आहेत.
आज शनिवार असल्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा होती. सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही शाळा भरते. मात्र आज सकाळी 10 वाजेपर्यंत शाळेत एकही शिक्षक आला नव्हता. ही बाब शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांना समजली. त्यांनी तातडीने शाळेत भेट दिली.
त्यावेळी विद्यार्थी वरांड्यात बसल्याचे दिसून आले. एकही शिक्षक शाळेत नव्हता. याबाबत त्यांनी अधिक चौकशी केली असता मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांच्या मुलीचा साखरपुडा असल्याने त्या कोल्हापूरला गेल्याचे समजले. तर दिपाली भोसले या शिक्षिकाही कोल्हापूरलाच गेल्याची माहिती मिळाली. दीपक माळी हे शिक्षकही तासगाव येथून आपल्या घरातून कोल्हापूरला जाण्याच्या तयारीत होते.
सुमारे 65 विद्यार्थी असणारी जिल्हा परिषदेची शाळा रामभरोसे सोडून हे तीनही शिक्षक कौटुंबिक कार्यक्रमाच्या नियोजनात होते. विशेष म्हणजे या तीनही शिक्षकांनी आजची कोणत्याही प्रकारची रजा काढली नव्हती. दरम्यान, आज सकाळी ही शाळा कोणी उघडली, याबाबत माहिती घेतली असता, गावातील सरिता कदम यांच्याकडे काल सायंकाळीच शिक्षकांनी शाळेची चावी दिल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषदेची ही शासकीय शाळा आहे. या शाळेची चावी एका खाजगी व्यक्तीकडे देताना शिक्षकांनी कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी हा प्रकार गट विकास अधिकारी के. पी. माने, गटशिक्षण अधिकारी आबासो लावंड यांच्या कानावर घातला. लावंड यांनी हा प्रकार समजतात तातडीने बस्तवडे शाळेस भेट दिली.
तत्पूर्वी दीपक माळी हे शिक्षक सकाळी 10 वाजता शाळेत पोहोचले होते. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी लावंड यांनी शिक्षकांचे हजेरी रजिस्टर तपासले असता, एकाही शिक्षकाने आज रजा काढली नसल्याचे दिसून आले. शिवाय या शिक्षकांचा रजेचा अर्जही नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्याध्यापिका विद्या मिरजकर या तर गेल्या तीन दिवसांपासून कोणतीही रजा न घेता शाळेत गैरहजर आहेत. तर दिपाली भोसले या शिक्षिकेचीही दोन दिवसांपूर्वी हजेरी पत्रकावर सही नाही. त्या दिवशीची त्यांची रजाही नाही. तसा कोणता अर्ज शाळेत उपलब्ध नाही. त्यामुळे रजा न घेता 'दांड्या' मारायची सवय या शाळेतील शिक्षकांना लागल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आज शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळेत आले असतानाही हे तीनही शिक्षक कोल्हापूरला साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायला निघाले होते. हा सगळा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी लावंड व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी गंभीर दखल घेतली आहे. सकाळी 10 वाजता शाळेत उपस्थित झालेल्या दीपक माळी या शिक्षकासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील व ज्या महिलेने सकाळी शाळा उघडली त्या सरिता कदम, शालेय पोषण आहार करणाऱ्या सविता शेळके यांचा जबाब घेण्यात आला आहे. शाळेतील उर्वरित दोन शिक्षिका विद्या मिरजकर व दिपाली भोसले या आज दिवसभर शाळेत आल्याच नाहीत. त्यांचा सोमवारी जबाब घेतला जाणार आहे.
शाळेत झिरो शिक्षकाची नेमणूक..!
बस्तवडे येथील जिल्हा परिषदेत शाळेत मुख्याध्यापिका विद्या मिरजकर, सहकारी शिक्षिका दिपाली भोसले व दीपक माळी या तिघांनी मिळून सरिता कदम नावाची एक झिरो शिक्षिका नेमली होती. तिला हे तीनही शिक्षक प्रत्येकी 1000 रुपये प्रमाणे वर्गणी काढून 3000 रुपये पगार देत होते. या शिक्षिकेने ऑगस्ट - सप्टेंबरच्या दरम्यान दीड महिने या शाळेत ज्ञानदानाचे कामही केले आहे. त्यामुळे निमणीप्रमाणेच बस्तवडे शाळेतही झिरो शिक्षक नेमला होता, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अहवाल पाठवा, ‘कार्यक्रम’ करू : मोहन गायकवाड
बस्तवडे जिल्हा परिषद शाळेतील आजच्या गंभीर प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांना माहिती दिली. यावेळी गायकवाड यांनी हा प्रकार गंभीर आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत नव्हता, हे अत्यंत चुकीचे आहे, असे सांगून याप्रकरणी सर्वांचे जबाब घेऊन माझ्याकडे सविस्तर अहवाल पाठवा. त्यांचा 'कार्यक्रम' करू. त्यांच्यावर कारवाई करू. कोणाचाही लाड करायला नको, असे स्पष्टपणे सांगितले आहे.