उमदी : जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी बालगाव शाळेची सहल देवगड तालुक्यात घेऊन गेलेली बस अचानक नादुरूस्त झाल्याची शिक्षकांकडून माहिती मिळताच अगदी काही मिनिटात देवगड डेपोमधून दुसऱ्या बसची सोय करून दिल्याने विना व्यत्यय शाळकरी मुलाची सहल पुर्ण झाली.आमदार पडळकर यांच्या सतर्कतेबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
त्याचे झाले असे,जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बालगाव येथील विद्यार्थ्यांची सहल मंगळवेढा बस डेपोच्या दोन बसमधून कोल्हापूर,कनेरी मठ,आदमापूर,राधानगरी,जलदुर्ग व विजयदुर्ग किल्ला,कुणकेश्वर मंदिर अशा विविध ठिकाणी भेट देण्यासाठी निघाली होती.जवळपास सर्व ठिकाणे बघून दोन्ही बस परत येत असताना देवगड तालुक्यातील शिरगाव पोलीस चौकी येथे एक बस अचानक गिअर बॉक्स बंद पडल्याने नादुरूस्त झाली.
त्या बसची दुरुस्तीसाठी मोठा वेळ लागत असल्याने विद्यार्थ्यांना ताटकत थांबवावे लागणार हे ओळखून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पांढरे सर यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना संपर्क करत परिस्थितीची माहिती दिली.दरम्यान आ.पडळकर यांनी लागलीच स्थानिक आमदारांच्या मदतीने देवगड बसस्थानकांशी संपर्क करताच अगदी काही मिनिटांमध्ये देवगड डेपोमधून विद्यार्थ्यांसाठी दुसरी बस गाडी मिळाली.
त्या बसमधून सर्व विद्यार्थी वेळेत सुखरूप गावी पोहचले.दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी सतर्कता दाखवत वेळेत बस उपलब्ध करून दिल्याने आम्हची मोठी सोय झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.त्याचबरोबर आ.पडळकर यांचे आभार मानले.