– गृह व सहकार मंत्री अमित शाह
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ
पुणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे. वीस लाख कुटुंबांच्या जीवनात एकाच वेळी आनंद निर्माण करण्याचा हा क्षण अत्यंत दुर्मिळ व ऐतिहासिक आहे, येणारी दिवाळी तुमच्या नवीन घरात सुखा-समाधाने साजरी करा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरीता आपण व आपल्या भावी पिढीने भरीव योगदान द्यावे, असे आवाहन देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.
तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ मोफत वीजेसाठी सौर पॅनलकरीता अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने श्री छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी पत्राचे वाटप आणि १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, बापुसाहेब पठारे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न प्रधानमंत्री मोदी पाहत आहेत असे सांगून श्री. शाह म्हणाले, विकसित राष्ट्र म्हणजे भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःचे घर, वीज, शौचालय , गॅस सिलिंडर, धान्य, पाच लाख रुपयांचे आरोग्य सुविधा हीच विकसित राष्ट्राची संकल्पना आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती नसून येणाऱ्या पिढीचे विकासाचे पहिले पाऊल याच घरात पडते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांना घरी देण्याबरोबरच शौचालय देऊन त्यांच्या सन्मानाने स्वाभिमानाची सुरक्षा केली आहे. यासाठी देशात ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणाच्या माध्यमातून महिला, दिनदुर्बल, दलित, आदिवासी अशा सर्व घटकांना घरकुले देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या माध्यमातून सन 2029 पर्यंत देशात पाच कोटी घरे देण्यात येणार असून यापैकी तीन कोटी 80 लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 13 लाख 57 हजार घरकुले मंजूर करण्यात आली असून आता दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरे देण्यात येत आहेत. ही सर्व घरे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजनही महाराष्ट्र शासनाने केले आहे.