आपल्याच सात वर्षाच्या मुलाला प्रियकरासोबत मिळून मारहाण करण्याचा आरोप असलेल्या एका महिलेला नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोणतीही आई आपल्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर करताना नोंदवले.
तक्रारदार वडील आणि आरोपी आई यांच्यात वैवाहिक वाद होते. ज्यामुळे अल्पवयीन मुलगा बळीचा बकरा बनला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी गुन्हा दाखल करताना विभक्त पत्नी आणि तिच्या प्रियकराने अनेकवेळा मुलावर मारहाण केली असून एकदा त्याला मारण्याचा प्रयत्नही केल्याचा तसेच प्रियकराने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा दावाही केला होता.
परंतु, प्रथमदर्शनी हे अविश्वसनीय वाटते, आई स्वतःच्या मुलाला मारहाण करण्याचा विचार करणार नाही, असे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदवले. तसेच या प्रकरणात याचिकाकर्तीला अटक करण्याचे कारण कळवताना संबंधित फौजदारी प्रक्रिया संहितेच्या अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात पोलिस अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने १५ हजारांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना नमूद केले.
काय आहे प्रकरण?
तक्रारीनुसार, २०१९ मध्ये अल्पवयीन मुलाचे पालक विभक्त झाल्यानंतर मुलगा रत्नागिरी येथे त्याच्या वडिलांसोबत राहत होता. तथापि, २०२३ मध्ये, याचिकाकर्ती जबरदस्तीने मुलाला मुंबईत घेऊन गेली. परंतु, मुंबई आणल्यावर मुलाला अनेकदा मारहाण करण्यात आली आणि एकदा त्याला मारण्याचा प्रयत्नही केल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी दहिसर पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर याचिकाकर्तीला ऑक्टोबर २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ती कोठडीत आहे.