प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकले,मात्र त्याने त्याचा गळा सोडला नाही आणि पतीसह प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना ढाळे पिंपळगाव येथे घडली आहे.नुकतेच बार्शी तालुक्यातील (महागाव)ढाळे पिंपळगाव येथील तलावात दोघांचा बुडून मृत्यू झाला होता.या प्रकरणातील सत्यता पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. प्रेयसीच्या पतीला उचलून तलावात फेकताना त्याने त्याचा गळा धरला आणि प्रियकरही पाण्यात बुडून मरण पावला असल्याची कबुली साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मयत गणेश अनिल सपाटे (वय २६, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (वय ३५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलेला अटक केली आहे.मयत त्या दोघांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली होती. तपासादरम्यान, साक्षीदार गणेश खरात याने काही महत्त्वाच्या बाबींचा खुलासा केला. गणेश सपाटे व साक्षीदार गणेश खरात हे मित्र होते. सपाटे याने या मित्रापुढे नातेवाइकाच्या पत्नीसोबत संबंध असल्याचे सांगून तिचा नवरा अडथळा ठरत असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला ठार मारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
१७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश सपाटे, त्याचा मित्र गणेश खरात आणि शंकर पटाडे हे तिघे मिळून दारू पार्टीसाठी बार्शी तुळजापूर रोडवरून बावीच्या पुढे गेले. रात्रीच्या वेळी तिघेजण महागावच्या पुलाजवळ पोहोचले. दोघेजण पुलावर गप्पा मारत उभे होते.गणेश खरात यांने शंकर पटाडे याला तलावात ढकलून देत असतानाच शंकरने गणेश गळा न सोडल्याने दोघेही तलावात पडल्याने बुडून दोघाचा मृत्यू झाला होता.