तासगाव शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरात स्वच्छतेचे तीन – तेरा वाजले आहेत. याबाबत पालिकेला वारंवार कळवूनही स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आज मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना शहरातील अस्वच्छता दर्शवणारा डिजिटल फलक दिला. येत्या 10 दिवसात शहर स्वच्छ झाले नाही तर पालिकेसमोर उपोषण करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
एकीकडे पालिका प्रशासनाकडून स्वच्छ व सुंदर तासगावचा डांगोरा पिटला जात आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तासगावातील अस्वच्छतेचा आज पंचनामा केला. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेचे त्याकडे लक्ष नाही. अनेक दिवस एकाच ठिकाणी कचरा पडून असतो. घंटागाड्यांचे नियोजन नाही. पालिका प्रशासन व स्वच्छता ठेकेदाराचे शहर स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
याबाबत शहरातील अस्वच्छता दर्शवणारा डिजिटल फलक मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी शहरातील घाणीबाबत संताप व्यक्त केला. गल्लीबोळातून कचरा पडलेला आहे. अनेक दिवस कचऱ्याला हातही लावला जात नाही. सार्वजनिक मुताऱ्या वास मारत आहेत. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. मात्र या पैशातून केवळ ठेकेदाराचे घर भरले जात आहे. कोणाचेही शहर स्वच्छतेकडे लक्ष नाही, असे आरोप करण्यात आले.
अनेक भागात स्वच्छताच होत नाही. ठेकेदाराचे कामगार उर्मट आहेत. त्यांची भाषा नीट नसते. सामान्य लोकांनी तक्रार केल्यास ते व्यवस्थित बोलत नाहीत. शिवाय जेवढे कामगार शहर स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत तेवढे प्रत्यक्षात कामावर हजर नसतात, अशा अनेक तक्रारी मुख्याधिकाऱ्यांसमोर करण्यात आल्या.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. तर येत्या 10 दिवसात शहर स्वच्छ न झाल्यास पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. यावेळी अमोल शिंदे, बाळू सावंत, अभिजित पाटील, स्वप्नील जाधव, इंद्रिस मुल्ला, अक्षय धाबुगडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.