सांगली : सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सन 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी या योजनेचे सांगली जिल्ह्यासाठी 800 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सांगली जिल्ह्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. योजना सुरू झाल्यापासून प्रथमच सांगली जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
यावर्षी उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन 3 हजार 800 अर्ज बँकाकडे सादर केले होते. या अंतर्गत एकूण 800 प्रकरणांमध्ये शासनाचे 24 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या पुढेही कर्ज प्रकरणे मंजूर होणार आहेत.
या योजनेअंतर्गत सन 2024-25 चे 100 टक्के उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक या नॅशनल बँकांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक या बँकानी उत्कृष्ट कामगिरी केली.
या योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर, अमरजीत गायकवाड तसेच उद्योग निरीक्षक सुजाता देसाई, नीलेश सावंत, नसरीन पटेल यांनी प्रयत्न केले. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बँकांच्या प्रत्येक शाखेस भेटी देवून, कागदपत्रांसाठी प्रत्येक प्रकरणांचा पाठपुरावा व योजनेसंदर्भात असलेल्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, एमएसआरएलएम तालुका समन्वयक, श्री. शिनगारे, जिल्हा समन्वयक मावीम, श्री. मतीन एनयूएलएम यांचे योगदान लाभले.
राज्यात एकूण 36 जिल्ह्यांपैकी प्रथम उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह तसेच शैलेन्द्र रजपूत, उद्योग सहसंचालक पुणे विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी तसेच नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देखील वेळोवेळी बैठका घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याचे श्रीमती कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.