महा-ई-सेवा केंद्र चालकाचा कारनामा : तहसीलदारांकडून नोटीस
तालुक्यातील कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्रात एका विद्यार्थिनीच्या गॅप सर्टिफिकेटच्या प्रतिज्ञापत्रावर चक्क तहसीलदारांची बोगस सही ठोकल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. सेतू चालक दीपक सरगर याने हा कारनामा केला आहे. याप्रकरणी सरगर याला तहसीलदार अतुल पाटोळे यांनी नोटीस काढून खुलासा मागितला आहे.
याबाबत माहिती अशी : कवठे एकंद येथे दीपक सरगर यांचे जनाधार महा-ई-सेवा केंद्र आहे. या सेवा केंद्रातून विविध प्रकारचे दाखले वितरित केले जातात. तहसील व प्रांत कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी या सेवा केंद्रात विद्यार्थी, शेतकऱ्यांसह अन्य लोक प्रतिज्ञापत्र करतात. मात्र या सेवा केंद्राचे मालक दीपक सरगर यांच्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या.
कुमठे (ता. तासगाव) येथील मृणाली महादेव पाटील हिला शैक्षणिक कामासाठी गॅप सर्टिफिकेट काढायचे होते. तिने त्यासाठी कवठेएकंद येथील जनाधार महा-ई-सेवा केंद्राचे दीपक सरगर यांच्याशी संपर्क साधला. मृणाली हिला हे गॅप सर्टिफिकेट तात्काळ हवे होते. त्यासाठी तिने या महा-ई-सेवा केंद्रात प्रतिज्ञापत्र केले होते.
मात्र सरगर यांनी हे प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयात नेवून रीतसर नोंद करून त्यावर तहसीलदारांची सही घेणे अपेक्षित होते. पण, मृणाली पाटील यांना हे सर्टिफिकेट तात्काळ हवे असल्याने सरगर यांनी बिनधास्तपणे त्यावर चक्क तहसीलदारांची सही ठोकली. हे कृत्य करताना त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार केला नाही.
दरम्यान, हे प्रतिज्ञापत्र घेऊन मृणाली हिने एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र तेथील प्राचार्यांना प्रतिज्ञापत्रावर तहसीलदारांची सही बोगस असल्याची शंका आली. याबाबत त्यांनी खातरजमा करण्याचा प्रयत्न केला.
तर याप्रकरणी तासगाव तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल झाली. या तक्रारीनंतर तहसीलदार अतुल पाटोळे यांनी दीपक सरगर यांना नोटीस काढून खुलासा मागविला आहे. प्रतिज्ञापत्रावर सही आपलीच आहे का, अशी विचारणा करण्यात आली आहे. शिवाय 24 तासात खुलासा न आल्यास महा-ई-सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याचाही इशारा या नोटीसीद्वारे देण्यात आला आहे.