महसूलच्या ११० जणांची अवयवदानासाठी नोंदणी

0
10

जत : जत तालुक्यातील महसूल विभागाने अवयवदानाच्या बाबतीत एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील तब्बल ११० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण यात पाहायला मिळाले.

महसूल विभागाच्या सामूहिक आणि दूरदृष्टीच्या निर्णयामुळे अवयवदानाविषयी समाजात मोठी जनजागृती होणार आहे, तसेच इतर विभागांनाही यातून प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात प्रांत अधिकारी अजयकुमार नष्टे व तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या पुढाकाराने झाली. त्यांनी स्वतः अवयवदानाची नोंदणी करून आपल्या सहकाऱ्यांनाही यासाठी प्रेरित केले.

त्यांच्या या आवाहनाला तालुक्यातील महसूल विभागातील निवासी नायब तहसीलदार पंडित कोळी, महसूल नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे, संगायो नायब तहसीलदार आण्णासाहेब धोडमाळ, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुभद्रा कुंभार, निवडणूक नायब तहसीलदार मनोज मेंगारती, सहायक महसूल अधिकारी राहुल कोळी, सहायक महसूल अधिकारी हेमा संकपाळ, महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष सिदू आप्पा शिंदे (माजी सैनिक), ग्राम महसूल अधिकारी अध्यक्ष गुरव, चतुर्थ श्रेणी अध्यक्ष विक्रम हाताळे, महसूल सेवक अध्यक्ष सुभाष कोळी व त्यांच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि महत्त्वाचा निर्णय घेतला.तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार आणि सर्व संगणक ऑपरेटर यांनी अवयवदानासाठी नोंदणी करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे.

अवयवदान करण्याचे महत्त्व

अवयवदान हे मानवी जीवनातील अत्यंत पवित्र आणि उदात्त दान मानले जाते. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे अवयव जसे की डोळे, मूत्रपिंड, हृदय, यकृत, फुप्फुसे, त्वचा इत्यादी दान केल्याने गंभीर आजारी किंवा अपघातात अवयव गमावलेल्या अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. यामुळे केवळ रुग्णांचे प्राण वाचत नाहीत, तर त्यांच्या कुटुंबांनाही मोठा आधार मिळण्यास मदत होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here