शिव्या शाप देणारा नव्हे तर आशीर्वाद देणारा व्यवसाय करा ! 

0
10

अवैध दारू साठा जप्त, लाखो रुपयांचा गुटखा जप्त, कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, शेतामध्ये गांजा पिकवणारा गजाआड, जुगाराच्या क्लबवर धाड, मटक्याच्या अड्ड्यावर धाड, सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, अधिक पैशाचे आमिष दाखवून लाखो रुपयाला गंडा, फसवून जमीम बळकावली या आणि  अशाप्रकारच्या अनेक बातम्या आपण नेहमीच वर्तमानपत्रात वाचत असतो. दररोजच्या वर्तमानपत्रात अशा प्रकारची एक तरी बातमी आपल्याला वाचायला मिळते. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी जेंव्हा देशभर कोरोना  होता,  कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते. संपूर्ण देश  कुलूपबंद होता तेंव्हा देखील अशाप्रकारच्या बातम्या वाचायला मिळत होत्या. गुटखा, गांजा यासारख्या अमलीपदार्थांवर राज्यात बंदी आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात दारूवर देखील बंदी आहे मात्र बंदी असतानाही काही महाभाग या बंदीची संधी साधून गुटखा, गांजा बाजारात विकायला आणतात. विशेष म्हणजे हे अमली पदार्थ  ब्लॅकने विकली जातात म्हणजे अधिक पैसे देऊन ती विकले जातात. ज्या जिल्ह्यात दारूवर बंदी आहे तिथे देखील ब्लॅकने दारू विकली जाते. काही ठिकाणी पोलीस आणि प्रशासनाचे हात ओले करून बेधडकपणे या पदार्थांची विक्री केली जाते. जुगार मटका यासारखे अवैध धंदे देखील असेच बेधडकपणे सुरू असतात. वरिष्ठांकडून दबाव आल्यास कारवाईचा दिखावा केला जातो, काही दिवसांनी या अवैध व्यवसायांचा पुनश्च हरिओम होतो. कारण संबंधितांनी सोडलेली लाज. केवळ पैसे कमावणे या एकाच उद्देशाने हे महाभाग समाजाचे आरोग्य धोक्यात आणतात.  गुटखा खाल्ल्याने दरवर्षी लाखो लोक कर्करोगासारख्या असाध्य रोगाला बळी पडतात. गुटखा खाल्ल्याने कर्करोग होतो हे माहीत असूनही गुटखा बनवणारे गुटखा बनवतात, विकणारे विकतात आणि खाणारे खातात.

दारूबंदीचा फक्त फार्स केला जातो. ज्या भागात दारूबंदी आहे त्या भागात तर जास्त दराने दारू विकली जाते. ड्राय डे च्या दिवशीही दारू ब्लॅकने विकली जाते. दारूमुळे लाखो कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. दारूमुळे संसाराची राखरांगोळी होते. दारू पील्यामुळे यकृताचा आजार होतो. त्या आजारात जर घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याची लेकरे बाळे उघड्यावर पडतात हे माहीत असूनही लोक दारू पितात कारण त्यांना ती सहज उपलब्ध होते. जुगार आणि मटका खेळून अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. ही कर्जे फेडण्यासाठी सावकाराकडे जाण्याची वेळ अनेकांवर येते.  सावकाराकडून काढलेले कर्ज फेडता न आल्याने  काहींनी  आत्महत्या केल्या आहेत. मटका जुगारामुळे जमीन जुमला विकण्याची वेळ काहींवर आली आहे. हजारो लोकांचे आयुष्य उध्वस्त करणारे, समाजाच्या आरोग्याची नासाडी करणारे कर्करोगासारख्या असाध्य रोगाचा विळखा घालून मृत्यूसमीप नेणारे उद्योग कोणी करू नये अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असली तरी हे सारे सुरूच आहे याचे कारण हे व्यवसाय करणाऱ्या महाभागांना याचे काही देणेघेणे नाही त्यांना हवाय तो फक्त पैसा.  पैशासाठी सर्वकाही ! या उक्तीप्रमाणे हे लोक काम करतात.

यांना कोणाच्या संसाराचे देणेघेणे नाही की कोणाच्या आरोग्याचे. यांचा उद्देश केवळ आणि केवळ पैसा कमावणे हाच आहे. आपला पैसा कमावण्याचा व्यवसाय हा कोणाचा तरी संसार उध्वस्त करणारा असेल तर त्या पैशातून आपल्याला समाधान मिळेल का ? याचा विचार संबंधितांनी करावा. ज्यांचा संसार उध्वस्त झालाय, व्यसनांमुळे ज्या घरातील कर्ता पुरुष देवाघरी गेलाय त्या घरातील लोक या लोकांना शिव्याशापच देत असतील.  तेंव्हा असा शिव्या शाप मिळणारा व्यवसाय करण्याऐवजी लोकांचे आशीर्वाद मिळतील असा व्यवसाय संबंधितांनी करावा.  

  श्याम ठाणेदार    

 दौंड जिल्हा पुणे  

 ९९२२५४६२९५

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here