सांगली : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये विटा नगरपरिषदेने 20,000 ते 50,000 लोकसंख्येच्या गटात देशात अव्वल स्थान पटकावले असून, यासाठी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते व केंद्रीय गृहनिर्माण नगर विकास मंत्री मनोहर लाल आणि राज्यमंत्री तोखन साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालिका प्रशासनाला सन्मानित करण्यात आले. राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रधान सचिव नगरविकास विभाग-2 डॉ. के. एच. गोविंदराज, राज्य मिशन डायरेक्टर स्वच्छ महाराष्ट्र शहरी नवनाथ वाठ, विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विटा शहराच्या सातत्यपूर्ण स्वच्छता कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान झाल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विटा नगरपरिषदेचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
शहरी गृहनिर्माण व विकास मंत्रालयाने यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ करिता गुणांकन पध्दती बदललेली असून ‘सुपर स्वच्छ लीग’ ही नवीन विशेष कॅटेगरी निर्माण केली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ पर्यंत जी शहरे सलग तीन वर्षे रँकमध्ये आहेत, अशा शहरांसाठी ‘सुपर स्वच्छ लीग’ ही विशेष कॅटेगरी निर्माण करण्यात आली. यामध्ये 20 हजार ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये विटा शहराने सुपर स्वच्छ मानांकन मिळवले असून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे विटा शहराने आता स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये मानांकन प्राप्त करीत आपली विजयपताका कायम फडकवत ठेवली आहे. यासोबतच कचरामुक्त शहराचे पंचतारांकित (5 स्टार) मानांकन’ तसेच हागणदारी मुक्त कॅटेगरीमध्ये ODF++’ मानांकनही विटा शहराने कायम राखले आहे.
प्रशासक डॉ. विक्रम बांदल यांनी या यशाचे श्रेय लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, शहर स्वच्छ ठेवण्याकरिता अहोरात्र झटणारे स्वच्छतामित्र, सामाजिक संस्था, महिला बचत गट, पत्रकार बंधू, तरुण मंडळे, सर्व शाळा महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थी, स्वच्छताप्रेमी विटेकर नागरिक, विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था व असोसिएशन, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, सर्व कंत्राटदार अशा सर्व सक्रिय सहभाग दिलेल्या घटकांना दिले.
विटा शहराचा समावेश स्वच्छतेत सातत्य राखणाऱ्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये होणे ही प्रत्येक विटेकर नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमप्रसंगी स्वच्छता निरीक्षक नारायण शितोळे, वाहन व्यवस्थापक आनंदा सावंत, नितीन टकले, अनिल पवार, अर्जुन सूर्यवंशी, दीपक सातपुते हेदेखील उपस्थित होते.
विटा नगरपरिषदेची स्वच्छतेतील सातत्यपूर्ण कामगिरी
विटा नगरपरिषदेने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक असे स्वच्छता उपक्रम राबवित इतर शहरांसाठी एक मापदंड प्रस्थापित करून दिलेला आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समावेशासाठी 85 टक्केपेक्षा अधिक गुणांकन राखणे अनिवार्य होते. त्यातही विटा नगरपरिषदेने लोकसहभागावर भर देत अनेक उल्लेखनीय प्रकल्प राबवले.
निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक व सॅनिटरी कचरा अशा प्रकारे कचरा वर्गीकरण, कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी सर्व घंटागाड्यांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मार्ग निरीक्षण व नियंत्रणासाठी जीपीएस प्रणाली, शहरात व्यापारी भागामध्ये ठिकठिकाणी क्लोथ वेंडिंग मशीन व प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन, घनकचरा व्यवस्थापन भूमी येथे देखील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून घनकचरा व्यवस्थापन असे अनेक उपक्रम नगरपरिषदेने राबवले. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करिता अत्याधुनिक कार्यप्रणालींचा वापर करून तसेच स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबवून विटा नगरपरिषद नेहमीच देशव्यापी स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळविण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. स्वच्छताविषयक सातत्यपूर्ण जनजागृतीपर उपक्रम आयोजनातून शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. त्यामुळेच विटा नगरपरिषदेस अव्वल स्थान प्राप्त झाले आहे.




