*जत : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे जत (सांगली) दौऱ्यावर आले असता वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांकडून त्यांना मानधन वाढीसंदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात त्यांनी असे म्हंटले आहे की, कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये प्राध्यापकांची महत्वाची भूमिका असते त्या प्राध्यापकांवर तासिका तत्त्वाचा शिक्का मारुन शासन त्यांना वेठबिगारीची वागणूक देत आहे. स्वतंत्र भारतात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना गुलामांची वागणूक मिळत आहे. हे महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीने लाजीरवाणी गोष्ट आहे.
राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्वाची भूमिका निभावणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती प्रत्यक्षात नऊ महिन्यासाठी केली जाते, त्यांना मानधन आठ महिन्यांचे मिळत असते. हंगामी व कमी मानधन यामुळे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्राध्यापकांवर रोजंदारी करण्याची व उपासमारीची वेळ निर्माण होत आहे. त्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे किमान वेतन पंचावन्न हजार करण्यात यावे. त्याचबरोबर त्यांची नियुक्ती अकरा महिन्यांची करण्यात यावी, नोकरीत कायम करून घेताना त्यांच्या सेवेचा विचार करण्यात यावा, वैद्यकीय रजा मिळावी, महिला प्राध्यापकांना मातृत्व रजा मिळावी.
यासंदर्भात बोलताना प्रा. कुमार इंगळे(सीएचबी धारक) म्हणाले, अनेक वर्षे तासिका तत्त्वावर काम करूनही सेवेत कायम होण्याची हमी नाही. आजच्या महागाईच्या काळात बारा महिने काम, आठ महिन्यांचे तटपुंजे वेतन व नऊ महिन्यांची नियुक्ती यामुळे सीएचबी धारकांची ससेहोलपट होत आहे. आजच्या काळात बिगारी सुद्धा आमच्यापेक्षा अधिक कमावतो.शासनाने यासंदर्भात विचार करावा.
यावेळी प्रा. कुमार इंगळे, डॉ.प्रफुल्ल गायकवाड, प्रा. धनंजय वाघमोडे, प्रा.तुकाराम सन्नके, प्रा.अनुप मुळे, प्रा.विशाल गोडबोले, प्रा. उमेश कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे,डॉ सतीशकुमार पडोळकर व श्री.बापू सावंत हे उपस्थित होते.




