सांगली : सांगली जिल्ह्याचा वार्षिक जीडीपी सध्या 67 हजार कोटी असून तो आपल्याला 1 लाख 77 हजार कोटी रूपयांवर नेण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. त्यासाठी बाहेरचा पैसा आपल्या जिल्ह्यात येणे अपेक्षित आहे. जपान, जर्मनीप्रमाणे आपल्याला आपल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचे तंत्र अवलंबून सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण – फळबागेतून समृध्दीकडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस संचालक मंडळ अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, प्रकल्प संचालक मॅग्नेट विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, सरव्यवस्थापक (पणन) कोल्हापूर सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा पांडुरंग बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये अनेक सकारात्मक बाबी होत असून, जिल्ह्याची वाटचाल जिरायत कडून बागायतीकडे सुरू झाली आहे. एकेकाळी आटपाडी, विटा, जत या भागात टँकरशिवाय पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. आज त्या भागामध्ये उपसा सिंचन योजनेमुळे शाश्वत पाणीपुरवठ्याचे साधन उपलब्ध झाले आहे. जेव्हा शेतीसाठी पाणीच नव्हते, त्यावेळी जिरायत पिकाशिवाय पर्याय नव्हता. परंतु आता शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मार्ग दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे तालुका कृषि अधिकारी प्रत्येक शेतकऱ्याशी जोडला गेला आहे, त्याप्रमाणे मार्केटिंगच्या दृष्टीने पणन विभागाचे कामकाज शेतकऱ्यांशी निगडीत व्हावे. पणन विभाग प्रत्येक शेतकऱ्याशी जोडला जावा. कृषि आणि पणन एकत्र आल्यास काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. द्राक्ष, आंबा, केळी, पेरू, डाळिंब आदि फळपीक उत्पादकांच्या अडचणींचे निराकरण या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यशाळेत संचालक मंडळ अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, प्रकल्प संचालक मॅग्नेट विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, सरव्यवस्थापक पणन कोल्हापूर सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा पांडुरंग बामणे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ आदि मान्यवरांनी कृषि मालाच्या निर्यात वाढीसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन व उत्पन्न वाढ, निर्यातीच्या दृष्टीने कृषि मालाची गुणवत्ता, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदिंबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.




