*राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ : भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण*
*तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा शनिवारी पार पडला. इस्लामपूरनंतर मिरजेत पक्षाचा भव्य मेळावा झाला. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मात्र या मेळाव्याकडे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पाठ फिरवली. त्यांच्या या ‘दांडी’मुळे पुन्हा एकदा त्यांचा भाजप प्रवेश चर्चेत आला आहे.
संजय पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळी नाव. सांगली नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांनी गड उभारला. या काळात तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला. हा संघर्ष इतका तीव्र होता की संपूर्ण महाराष्ट्र त्याकडे डोळे लावून बसला होता. नंतर मनोमिलन झाले आणि संजयकाकांना विधान परिषद मिळाली. मात्र कार्यकाळ संपताच पुन्हा संघर्ष पेटला आणि 2014 मध्ये त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश करताच संजय पाटील यांनी सलग दोन लोकसभा निवडणुका जिंकून खासदारकी मिळवली. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांना मोठा धक्का दिला आणि ते पराभूत झाले. पराभवानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, पण समोर होते स्व. आर.आर. पाटलांचा अवघा 25 वर्षांचा मुलगा रोहित पाटील. या लढतीने राज्यभरात खळबळ उडवली होती. मात्र रोहित पाटलांनी संजयकाकांना पराभवाची धूळ चारली.
फक्त चार महिन्यांच्या अंतराने सलग दोनदा पराभव झाल्याने संजयकाकांचा राजकीय गड डळमळीत झाला. गेल्या वर्षभरापासून ते राजकीय विजनवासात आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करूनही त्यांचे मन अजून रमलेले नाही. त्यामुळेच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवरच गेल्या काही महिन्यांत त्यांनी दिल्लीत वारंवार फेऱ्या मारत भाजप प्रवेशासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र ‘संजय पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे’ असे सांगून त्यांच्या भाजप प्रवेशाचे दरवाजे बंद करून टाकले होते. तरीसुद्धा संजयकाकांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. नुकतेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगली दौऱ्यावर आले असता त्यांनी संजय पाटील यांच्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या शक्यतांना पुन्हा खतपाणी मिळाले आहे.
अशा स्थितीत शनिवारी झालेल्या अजित पवारांच्या सांगली दौऱ्यातील संजयकाकांची गैरहजेरी ही चर्चेचा मुख्य विषय ठरली. ज्या अजित पवारांनी विश्वासाने त्यांना उमेदवारी दिली, त्यांच्याच कार्यक्रमाकडे संजयकाकांनी पाठ फिरवल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, राजकीय वर्तुळात आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की, संजयकाकांचे पाऊल पुन्हा भाजपकडेच वळते आहे का?
सांगली जिल्ह्यातील राजकारणात संजय पाटील नेहमीच समीकरणे बदलणारे नेते ठरले आहेत. त्यांच्या एका निर्णयाने तालुक्यातील राजकीय गणिते उलथतात. त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असले तरी भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक धार मिळाली असून, येत्या काही दिवसांत संजयकाकांचा राजकीय निर्णय सांगली जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा वादळ निर्माण करू शकतो.




