आज प्रत्येक घरात मोबाइल फोन सर्वत्र पोहोचला आहे. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत बहुतांश वेळ मोबाइलच्या पडद्यावर घालवला जातो. सुरुवातीला हे साधे मनोरंजन वाटत असले तरी त्यातूनच अनेकांच्या आयुष्यात मोठी संकटे जन्म घेत आहेत. ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया रील्स आणि सेक्सटॉर्शनसारखे प्रकार केवळ मानसिक आरोग्य बिघडवत नाहीत तर अल्पवयीन मुलांना आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलाकडे नेत आहेत, ही धोक्याची घंटा आहे.
ऑनलाइन गेमचे व्यसन : मानसिक दडपणाचा कहर
ग्रामीण भागातील आत्महत्यांच्या वाढत्या घटनांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. पब्जी सारख्या गेम्समध्ये अडकलेले विद्यार्थी अपयश सहन करू शकत नाहीत, तर सततची मानसिक दडपणं व एकाकीपण त्यांना गिळून टाकते. गेममधील पराभवावर मिळणाऱ्या निंदाजनक कमेंट्स, मित्रांकडून होणारी थट्टा आणि कुटुंबीयांना न सांगता मनात साचलेला ताण यामुळे ते आत्महत्येचा मार्ग निवडतात.
सेक्सटॉर्शनचा सापळा
याहूनही भयानक म्हणजे सेक्सटॉर्शनची वाढती प्रकरणे. सोशल मीडियावर खोट्या ओळखी करून अल्पवयीन मुलांना न्यूड व्हिडीओ कॉलच्या जाळ्यात ओढले जाते. सुरुवातीला साध्या गप्पांमधून सुरुवात होऊन ते नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉलपर्यंत पोहोचते. त्यांचे रेकॉर्डिंग करून नंतर ब्लॅकमेल केले जाते. मोठ्या रकमेची मागणी, न दिल्यास व्हिडीओ कुटुंबीय वा मित्रांना दाखवण्याची धमकी, काही वेळा क्लिप व्हायरल करण्याचे प्रकार घडतात. या असह्य ताणाखाली मुले आत्महत्या करतात.
सायबर सुरक्षा अभाव : यंत्रणेची उदासीनता
या घटनांची नोंद पोलीस यंत्रणेकडे जाते खरी, परंतु तपासात फारसे निष्पन्न होत नाही. देशभर इंटरनेटचे जाळे पसरले असले तरी सायबर क्राईम रोखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठोस इच्छाशक्ती यांचा अभाव ठळकपणे जाणवतो.
कुटुंब, समाज आणि शासनाची संयुक्त जबाबदारी
आजचा प्रश्न केवळ आत्महत्यांचा नाही, तर समाजाच्या मानसिक आरोग्याचा आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधणे, त्यांना वेळ देणे आणि डिजिटल सवयींवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर शासन व प्रशासनाने सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करणे, जनजागृती करणे आणि पीडितांना मानसिक आधार उपलब्ध करून देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मुलांच्या हातातील मोबाइल हा खेळण्यापेक्षा अधिक धोकादायक शस्त्र ठरू नये, यासाठी कुटुंब, समाज आणि शासन या तिन्ही स्तरावरून एकत्रित प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.



