मार्केट नसल्यानं वाचाळवीरांची संख्या फार वाढली – जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार

0
59

सांगली : “माझा एक प्रॉब्लेम आहे. मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही,” अशा बोचऱ्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार केला. ते सांगलीतील ख्रिश्चन आणि मुस्लिम अधिकार परिषद कार्यक्रमात बोलत होते.

भावे नाट्यगृह येथे डेमोक्रॅटिक ऑफ इंडियाच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाटील म्हणाले, “देशात अलीकडे एक मोठी समस्या वाढली आहे. मार्केट नसल्यानं वाचाळवीरांची संख्या फार वाढली आहे. वरिष्ठांकडे बघत नसल्याने हे काहीही बोलतात. पण सांगली जिल्हा ब्रिटिशांना घाबरलेला नाही. समाजात भेदभाव करू नका, सर्व जातींवर प्रेम करा.”

पुढे बोलताना त्यांनी सरकारवरही घणाघात केला. “ही सत्ता मत चोरीनं मिळालेली आहे. लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना आपण किती पोसायचं, हा विचार केला पाहिजे. देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो, तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती,” अशी टीका त्यांनी केली.

पडळकरांना दिला प्रत्युत्तर
अलीकडेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना राजीनाम्याचे आव्हान देत पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, “मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही. पण, मत चोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजात काही निंदा करणारे लागतात, अलीकडे मीही अशी लोकं तयार करू लागलो आहे.”

हिंदू संकटाच्या मुद्द्यावर सवाल
अल्पसंख्याक समाजातील मनमोहन सिंग पंतप्रधान आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना देश चांगला चालला होता, त्या काळात कधी हिंदू संकटात असल्याचं ऐकलं नाही, असं पाटील म्हणाले. “गेल्या 10-12 वर्षात सत्ता यांच्याच हातात असताना हिंदू संकटात कसा आला? हिंदू समर्थ आणि बळकट आहे, तो इतर धर्मांनाही समान मानणारा आहे,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here